वर्धा : नजीकच्या पवनार येथील विनोबा आश्रम परिसरात सध्या धाम नदीच्या वाहत्या पात्रामुळे नयनरम्य दृष्य पहावयास मिळते. अनेक पर्यटक, महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांंच्या संगतीने खास करून पहाटे फिरवयास येतात. इथल्या स्वच्छ आणि सुंदर वातावरणाची भुरळ सर्वांनाच पडत असते. परंतु त्यांच्याकडून आश्रमच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य धोक्यात आले आहे.पवनार येथील धाम नदी पात्रावर महात्मा गांधी आणि विनोबांच्या स्मृती जपलेल्या आहेत. नदीपात्रातील खडकांमध्ये अतिशय सुंदर असे बांधकाम करून या दोन महात्म्यांची स्मृतिस्थळे तयार करण्यात आली आहेत. तिथपर्यंत जाण्यासाठी छोट्याशा रस्त्याचीही निर्मिती करण्यात आली आहे. सध्या नदीला भरपूर पाणी असल्याने या छोट्या मार्गावरूनही पाणी वहात आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेटी देतात. सकाळी सकाळी फिरायला येत असलेल्यांची संख्याही वाढली असून त्यात मित्रांच्या गृपची संख्या भरमसाठ आहे.पहाटे आश्रमला भेटी देण्यात किंवा निसर्गरम्य परिसरात फिरायला येणे चांगलेच आहे. येथे आलेल्या पर्यटकांनी नियमांना बांधील राहून पर्यटनाचा आस्वाद घावा, तसेच दोन्ही महात्म्यांचे जीवनकार्य समजून घ्यावे यासाठी काही नियम घालून दिले आहेत. सर्वांना ते प्रकर्षाने दिसावे यासाठी दर्शनी भागातच नियमांचा फलक लावला आहे. पण असे असतानाही अनेकांकडून आश्रमच्या नियमांचा भंग होत आहे. समाधी परिसरात वाहने नेऊ नये यासाठी गेट तयार करण्यात आले होते. पण ते तुटल्याने अनेक युवक सकाळच्या वेळात विनोबांच्या समाधीजवळच गाड्या उभ्या करतात. तसेच समाधीवर चढून फोटो काढण्याचे धारिष्ट्यही काही महानग दाखवितात. या सर्व प्रकारामुळे आश्रम प्रतिष्ठानने घालून दिलेल्या नियमांंची पायमल्ली होत असून समाधी स्थळाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. बरेच जण या गाड्या धुण्यासाठीही समाधीपर्यंत नेत असल्याचे पहावयास मिलते.त्याचप्रमाणे आश्रम परिसरातच छत्रीच्या आकाराची सुंदर वास्तू बांधण्यात आली आहे. तिथे बसून समोरील नदीपरिसर चांगल्या प्रकारे न्याहाळता येतो. निवांत बसता यावे यासाठीच ही वास्तू निर्माण केली आहे. परंतु या परिसरातही अनेक जण घाण करून ठेवतात. तसेच मद्यपिंच्या पार्ट्याही या जागेवर रात्री रंगत असल्याच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात. त्यामुळे या स्थळाच्या पावित्र्यासोबतच सौंदर्यही धोक्यात आले आहे. पर्यटकांनी स्वत:वर आत्मसंयम ठेवून पर्यटनाला येणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)
आश्रम परिसरात नियमांची पायमल्ली
By admin | Updated: August 3, 2014 23:32 IST