वर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या समितीवर निमंत्रित तज्ज्ञ म्हणून सेवाग्राम येथील नई तालीमच्या आनंद निकेतन शाळेच्या मुख्याध्यापक सुषमा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र त्यांच्या नियुक्तीला जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. यावर गत सभेतही वादंग उठला होता. तो वादंग कायम राहत शनिवारी झालेल्या सभेत त्यांना या समितीवरून निष्कासित करण्याचा ठराव घेण्यात आला. शिक्षण विभागातील विकासात्मक योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षण समितीची स्थापना करण्यात येते. यात जिल्हा परिषदेच्यावतीरिक्त शिक्षण तज्ज्ञ म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक सत्रात या समितीवर सेवाग्राम येथील नई तालिमच्या आनंद निकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीपासूनच जिल्हा परिषदेच्या सभेत वादंग उठत होते. अशात त्यांच्या आनंद निकेतन शाळेची जिल्हा परिषदेच्यावतीने तपासणी करण्यात आली. ही तपासणी जिल्हा परिषद सदस्य गजानन गावंडे व शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे यांनी केली. यावेळी त्यांना सहकार्य करण्यात आले नाही. तपासणी करण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या शाळेच्या शिक्षकाचे जिल्हा परिषदेच्या समितीत काय काम असे म्हणत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत जि.प. सदस्य मनोज चांदूरकर, गजानन गावंडे यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी सुषमा शर्मा यांना समितीवरून काढण्याची मागणी केली. यात सर्व सदस्यांचे एकमत झाल्याने तसा ठराव घेण्यात आला. याला अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांनी अनुमोदन देत ठरावाला मान्यता दिली. या सभेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ठराव झाला असून त्यावर प्रांसिडींग होणे तेवढे शिल्लक आहे.(प्रतिनिधी)
शिक्षण समितीच्या निमंत्रित तज्ज्ञाच्या निष्कासनाचा ठराव
By admin | Updated: July 21, 2014 00:18 IST