वर्धा : गावच नव्हे तर संपूर्ण तालुका निर्मल करण्यासाठी प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाने पुढकार घेवून प्रत्येक घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. त्यासोबतच संपूर्ण कारंजा तालुका निर्मल करण्याचा संकल्प गुरुवारी माहिती अभियान कार्यशाळेत सरपंच व उपसरपंचानी केला आहे.कारंजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे माहिती अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुरेंद्र भुयार आणि डी.बी. पाटील यांनी निर्मल ग्राम व ग्राम स्वच्छतेविषयीच्या विविध योजनांची माहिती दिली. केवळ दोन ते अडीच हजार कुटुंबांनी शौचालय न बांधल्यामुळे कारंजा विदर्भातील पहिला निर्मल तालुका होवू शकत नाही, अशी खंत व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.करंजा पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पठारे, गोपाळ कालोकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, सुरेंद्र भुयार, बालकल्याणचे एस.एम. मेसरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, उपवन संरक्षक मुकेश गाणात्रा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी भालेराव, जिल्हा परिषद सदस्य सारिका कौशिक, गजभिये, तेजराम बनकर, भलावी, प्रकाश मनवर, प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते.सभापती मानमोडे यांनी ग्रामविकासाच्या व वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक बदलासाठी प्रत्येक विभागाची योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रास्ताविकात माहिती अभियान योजना संदर्भात माहिती दिली.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध योजना सांगताना पी.बी. पाटील यांनी कारंजा तालुक्यात दोन हजार शौचालय बांधण्याचा कार्यक्रम तसेच प्रत्येक गावात स्वच्छ पाणी व मिटरने पाणी देण्याची भूमिका विषद केली. उपवन संरक्षक मुकेश गाणात्रा यांनी वन्यप्राण्याच्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना मदत वनभागामुळे प्रलंबित विकास प्रकल्प सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची हमी दिली. वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याचे नियोजन करताना यापुढे सरपंच व ग्रामसेवकांनी मोफत पाणी न देण्याची भूमिका घ्यावी, तसेच प्रत्येक नळाला मिटर लावून पाणीपट्टी भरण्याबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करावी, अशी सूचना केली.सहायक प्रकल्प अधिकारी भालेराव यांनी बचतगट व प्रधानमंत्री जनधन योजनेची माहिती दिली. संचालन करीत उपस्थितांचे आभार विनीश काकडे यांनी मानले. यावेळी गटविकास अधिकारी पी.डी. कडबे, विस्तार अधिकारी मालधारी, पंचायत विस्तार अधिकारी घोडे, नायब तहसीलदार गी.बी. बर्वे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कारंजा तालुका निर्मल करण्याचा संकल्प
By admin | Updated: May 8, 2015 01:50 IST