जिल्ह्यात पहिल्यांदाच झाली नोंद : बहार नेचर फाऊंडेशनच्या पक्षी अभ्यासकांनी दिली माहिती वर्धा : येथील सिव्हील लाईन परिसरातील शासकीय इमारतीच्या मागील परिसरात दुर्मिळ देशी वृक्ष तीरचिमणींचा थवा दिसून आला. येथील बहार नेचर फॉऊंडेशनच्यावतीने ही नोंद करण्यात आली आहे. या पक्ष्यांना हिरवट पाठीची चरचरी असेही नाव असून इंग्रजीत ‘आॅलिव्ह बॅक पिपीट’ असे म्हणतात. मोटॅसिलीडी कुळातील हा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव अॅनथस हॉड्सोनी असे आहे. शरीराच्या वरील भागाचा रंग हिरवट तपकिरी व त्यावर रेशा, भुवया, पंखावरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पांढुरका असतो. हे पक्षी आपल्याकडील हिवाळी पाहुणे आहेत. जिल्ह्यात देशी वृक्ष तीरचिमणी अथवा हिरवट पाठीची चरचरीची प्रथमताच नोंद झालेली असून आठ चिमण्यांचा थवा वैभव देशमुख यांच्याकडून नोंदविण्यात आला आहे. त्याबाबत बहार नेचर फाऊंडेशनचे किशोर वानखेडे, रमेश बाकडे, रविंद्र पाटील, दिलीप विरखडे, राहुल तेलरांधे, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, संजय इंगळे तिगावकर, जयंत सबाने, पराग दांडगे, स्रेहल कुबडे, पवन दरणे, विनोद साळवे, घनश्याम माहुरे, राहुल वकारे आणि समस्त पक्षी अभ्यासकांनी व निसर्गप्रेमींनी त्यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)बांधकामांमुळे पक्षी धोक्यात सहसा पडीत किंवा निरूपयोगी मानण्यात येत असलेल्या जागांवर विकासकामे हातात घेतल्या जातात. प्रत्येक प्रकारचे भूभागावर वास्तव्य करण्याकरिता वेगवेगळे पक्षांच्या प्रजातींचे अस्तित्व टिकले आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर ओसाड समजल्या जाणाऱ्या जागांवर विकासकामे होत असून माळरानांवर कुठलाही अभ्यास न करता वृक्षारोपणाची कामे हाथी घेण्यात येत आहेत. माळरान, जलाशय, दलदली भाग, पठार, दगडाळ प्रदेश, यावर वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षांचे वास्तव्य असून तेथील भूभागावर होणारा थोडाही बदल त्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळेच पक्ष्यांंच्या प्रजाती दूर्मिळ होत चालल्या असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत व पक्षांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे.