वर्धा : वर्धेवरून राळेगावकडे जाणाऱ्या बसगाडीला रस्त्यातच बिघाड झाल्याने प्रवाश्यांवर ‘दे धक्का’ करण्याची वेळ आली होती. भंगार बसगाड्यामुळे प्रवाश्यांना अनेकवेळा बसला ‘धक्का’ देण्याची वेळ येत असते. यानंतरही परिवहन विभागाकडून गाड्यांच्या दुरूस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी संतप्त प्रवाश्यांतून व्यक्त करण्यात आली. वर्धा आगाराची बस क्र. एमएच ४० एन ८२१० ही प्रवासी घेवून राळेगावकडे जात असताना वायगाव (नि.) नजीक एकाएकी बंद पडली. चालकाने बराच प्रयत्न करूनही बस सुरू झाली नाही. यामुळे नाईलाजास्तव बसमधील प्रवासी खाली उतरले. वाहकासह प्रवाश्यांनी गाडीला धक्का दिला. यानंतर बस सुरू झाल्याने पुढील प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. परिवहन विभागात भंगार बसगाड्यांचा भरणा असल्याने प्रवाश्यांना नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. यात काही बसेस तर नेहमीच बंद पडतात. यामुळे चालकाला अन्य बसगाडीची व्यवस्था करावी लागते. यात प्रवाश्यांची ताटकळ होवून नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. किमान लांब पल्ल्यावरती भंगार बसेस देवू नये, अशी मागणी प्रवासी वर्गातून वर्धा आगार प्रमुखांना करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
भंगार बसला प्रवाश्यांचा ‘दे धक्का’
By admin | Updated: April 27, 2015 01:38 IST