लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नाभिक समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता नाभिक समाजबांधवांनी शनिवारी ‘माझे दुकान, माझी मागणी’ या शीर्षकाखाली दुकानासमोरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून निदर्शने दिली. जिल्ह्यातील हजारावर सलून दुकानदारांचा या आंदोलनात सहभाग होता.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून दुकाने बंद होती. यामुळे व्यावसायिकांसह कारागीर अडचणीत सापडले होते. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ होती. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली. मात्र, परत दुकाने बंद करण्याचे प्रशासनाने आदेश दिल्याने अद्याप सलून व्यवसाय ठप्प आहे. जिल्ह्यात दोन हजारांवर सलून व्यावसायिक तर पाच हजारांवर कारागीर आहेत. लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेक व्यावसायिकांची दुकाने भाडे तत्त्वावर तर काहींनी किस्तीवर गाळे खरेदी केले आहेत. त्यांच्यापुढे भाडे देण्यासह बँकेचे मासिक हप्ते आणि कारागीरांचे वेतन देण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. तर देणी थकल्याने अनेक मालकांनी व्यावसायिकांकडून दुकाने खाली करून घेतल्याचीही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे नाभिक समाजबांधव, ब्युटीपार्लर व्यावसायिक कमालीचे अडचणीत सापडले आहेत. नाभिक समाजातील सलून दुकानदार व कारागीर यांच्या स्वतंत्र पॅकेज करावे अथवा दुकानदारांना प्रतिमाह १० हजार रुपये आणि कारागिरांना प्रतिमाह ५ हजार रुपये देण्यात यावे, व्यावसायिक आणि कारागीर यांचे दुकान तसेच घराचे लॉकडाऊनकाळातील तीन महिन्यांचे वीज देयक माफ करावे, व्यावसायिक, कारागिरांना शासकीय विमा कवच लागू करण्यात यावे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कार्यशाळा राबवून सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांना सुरक्षा किट उपलब्ध करून कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने, ब्युटी पार्लर उघडण्याची परवानगी द्यावी अथवा आर्थिक मदत द्यावी आदी मागण्या प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आल्या.आंदोलनात नाभिक महामंडळ जिल्हा शाखेचे अध्यक्ष अशोक किन्हेकर, कमलाकर जांभूळकर, रवींद्र निंबाळकर, श्रीकांत वाटकर, वर्धा जिल्हा सलून असोसिएशनचे अध्यक्ष लिलाधर येऊलकर, सचिव संजय पिस्तुलकर, सेवाग्राम शाखेचे अध्यक्ष रविराज घुमे आदींसह अनेकांचा सहभाग होता. सामाजिक अंतर राखत स्वत:च्या दुकानाससमोर हातात फलक घेऊन व्यावसायिकांनी निदर्शने दिली.
नाभिक समाजबांधवांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून दुकाने बंद होती. यामुळे व्यावसायिकांसह कारागीर अडचणीत सापडले होते. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ होती. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली. मात्र, परत दुकाने बंद करण्याचे प्रशासनाने आदेश दिल्याने अद्याप सलून व्यवसाय ठप्प आहे.
नाभिक समाजबांधवांची निदर्शने
ठळक मुद्देजिल्हाभरात उदंड प्रतिसाद । ‘माझे दुकान माझी मागणी’ शिर्षाखाली आंदोलन