वर्धा : पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी हजारो टन खत व बी भरून ठेवले आहे. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. बियाणे व खताची विक्री सध्या थांबली आहे. मान्सून लांबल्यामुळे पिकांची पेरणीची वेळही आता बदलणार आहे. यामुळे आता या बियाण्यांचे काय करायचे असा प्रश्न विके्रत्यांसमोर उभा ठाकला आहे.दर वर्षी सरासरी जूनच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास ७० टक्के पेरणी पूर्ण होत असते. पेरणीसाठी लागणारे बियाण्यांची बुकींग व्यापारी दिवाळीच्या नंतर लगेच करून ठेवतात. त्यानुसार त्यांना माल उपलब्ध होतो. पावसाळ्यात माल कमी पडू नये म्हणून काळजी घेतलेली असते. तेव्हापासून व्यापाऱ्यांचा पैसा कंपन्याकडे जमा असतो. साधारण मे महिन्याच्या मध्यापासून शेतकरी बियाणे खरेदीसाठी येत असतात. कारण नंतर बियाण्यांचे भाव अचानक वाढवले जातात, तर कधी खताचा तुटवडा जाणवतो. त्यआमुळे शेतकरी आधीच बियाणे खरेदी करतात. मात्र यंदा जुलैच्या मध्यापर्यंतही जिल्ह्यात पेरणी पूर्णपणे आटोपणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. यामुळे शेतकरी वर्गासोबतच व्यापारी वर्गही चिंतेत अडकला आहे. एकंदरीत बियाण्याच्या व खताच्या खरेदीमध्ये अडकलेले हजारो कोटीचे व्यवहारही थांबले आहेत. बाजारातही मंदीचे सावट निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांनी बियाणे विक्रीसाठी घेतले तरी शेतकरी बियाणे घेण्यासाठी तयार नाहीत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी खत व बियाण्यामध्ये केलेली हजारो कोटी रूपयाची गुंतवणूक आता डोकेदुखी ठरत आहेत. पाऊस नसल्यामुळे पेरणीला सुरूवात झाली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे वेळ आली आहे.(शहर प्रतिनिधी)
मान्सूनच्या लांबणीने बियाणे बाजारावर अवकळा
By admin | Updated: July 5, 2014 23:44 IST