सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील गांधीवादी मगन संग्रहालय समितीच्या समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील नैसर्गिक शेती विकास केंद्रात सेंद्रिय कापूस प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील हे पहिलेच केंद्र असून येथे देशी कापूस उत्पादनापासून पेळूची निर्मिती होणार असल्याने वर्धा जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.गांधीवादी मगन संग्रहालयात सेंद्रिय कापूस ते खादीनिर्मिती असा प्रवास होतो. गिरड येथे सेंद्रिय कापसावर प्रक्रियेअंती पेळू तयार केले जाणार आहेत. देशी कापसापासून निर्मित या पेळूवर वर्ध्याच्या मगन संग्रहालयात प्रक्रिया केली जाते. सेंद्रिय कापसावर प्रथम जिनिंग प्रक्रिया करून पेळू निर्माण केला जाईल. या पेळूपासून सौर ऊर्जेवरील अंबर चरख्याच्या माध्यमातून धागा तयार करणे, नैसर्गिक रंगांनी रंगाईकाम, या धाग्यांचे कोन (रीळ) तयार करणे आणि निटिंग युनिटमध्ये कापड तयार करणे असा खादीनिर्मितीचा प्रवास आहे. मगन संग्रहालय समितीने समुद्रपूर तालुक्यात २००७ पासून नैसर्गिक शेतीची चळवळ उभारली आहे. हजारावर शेतकरी या चळवळीशी जुळले असून देशी पिकांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतात. देशी कापूस उत्पादनाकडे परिसरातील शेतकऱ्यांचा विशेष कल आहे. नैसर्गिक कापूस उत्पादक मंडळात शेकडो शेतकरी सहभागी असून सेंद्रिय कापसाचे मूल्यसंवर्धन होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मगन संग्रहालयाच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रावर सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली हळद, डाळ, मसाले, गहू ज्वारी आदी उत्पादनांवर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री कार्यान्वित आहे. याशिवाय शेतकºयांना गरजेनुसार सुविधा पुरविल्या जातात. परिसरातील शेकडो गावातील २५ हजार शेतकरी सुविधा घेत आहेत. आता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर या केंद्रात प्रक्रिया केली जात आहे. मगन संग्रहालयाच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता सेंद्रिय खादी निर्मितीसाठी प्रयत्नरत आहेत.तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस उत्पादित केल्यावर बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याची अडचण भासत होती. आता नैसर्गिक शेतीतून कापूस उत्पादन आणि खादी निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. तब्बल तीन वर्षांनंतर शेतकऱ्यांना या अभिनव केंद्राच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.- गजानन गारघाटे, प्रमुख,नैसर्गिक शेती विकास केंद्र,गिरड.
गिरडमध्ये सेंद्रिय कापसापासून होणार पेळूनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST
गांधीवादी मगन संग्रहालयात सेंद्रिय कापूस ते खादीनिर्मिती असा प्रवास होतो. गिरड येथे सेंद्रिय कापसावर प्रक्रियेअंती पेळू तयार केले जाणार आहेत. देशी कापसापासून निर्मित या पेळूवर वर्ध्याच्या मगन संग्रहालयात प्रक्रिया केली जाते. सेंद्रिय कापसावर प्रथम जिनिंग प्रक्रिया करून पेळू निर्माण केला जाईल.
गिरडमध्ये सेंद्रिय कापसापासून होणार पेळूनिर्मिती
ठळक मुद्देपहिले प्रक्रिया केंद्र : कापूस उत्पादकांना हक्काची बाजारपेठ