वर्धा : मान्सूनपूर्व कामे सर्व संबंधित यंत्रणांनी त्वरित पार पाडावीत. पूराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना गावांमध्ये कराव्यात. त्याकरिता आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी शेखरसिंग, अतिरिक्त पोलीस अधिकारी टी.एस. गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय अधिकारी वैभव नवाडकर, कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास माजरीकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी आर.के. गायकवाड यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी एन. नवीन सोना पूढे म्हणाले की, पाटबंधारे विभागाने धरणावरील गेटची तपासणी करावी. धरणनिहाय समन्वय अधिकारी नियुक्त करावेत. संभाव्य गावांना पूराचा धोका असल्यास त्या गावांना वेळीच सतर्क करण्यात यावे. त्या गावांची अद्ययावत यादी तयार करावी. संबंधित संभाव्य पूरग्रस्त गावातील ग्रामपंचायतींनीही आधुनिक पद्धत वापरून ग्रामपंचायतींमध्ये सायरन लावण्यात यावे. लाऊडस्पीकरची व्यवस्था करावी. नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यात यावे. त्यांची साफसफाई करण्यात यावी. जिल्हा परिषदेमार्फत लिलावाद्वारे देण्यात येणार्या बोटींची तपासणी करून नवीन लिलाव आयोजित करावा. प्लास्टीकची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. हातपंपाचे सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामध्ये क्लोरिनेशनचा वापर करण्यात यावा. पिण्यायोग्य व अयोग्य हातपंप, विहिरींचा अहवाल संबंधित यंत्राणांनी सादर करावा. मोडकळीस आलेल्या इमारती, अतिक्रमण धारकांनाही नोटीस पाठवाव्यात. पोलीस, होमगार्ड विभागानेही प्रशिक्षित बोटचालकांची व्यवस्था करावी. पूर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नदी काठावरील गावांचे नियोजन करावे. पूर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष स्थापन करून जिल्हा नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्रांशी समन्वय ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्यात. सर्व जिल्ह्यातील नगरपरिषद, तहसील कार्यालयातील अधिकार्यांनी मान्सूनपूर्व कामे आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकर्यांबाबतच्या अन्य समस्यांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्या
By admin | Updated: May 13, 2014 23:51 IST