आकोली : ग्रामीण मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, कुपोषणावर मात करता यावी. एकूणच ग्रामीण भागातील गरजुंची मुलं सुसंस्कारीत व्हावी या उदात्त हेतुने शासनाने अंगणवाडी, मिनी अंगणवाडी ही संकल्पना सत्यात उतरविली; पण सेलू तालुक्यात हा उदात्त हेतू मागे पडत असल्याचे वास्तव आहे. सेलू तालुक्यातील अंगणवाड्यांची पुरती वाट असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. शौचालय, रंगरंगोटी व अंगणवाडीला विद्युतपुरवठा करूण अंगणवाडीत पंखे लावण्याची तरतुद आहे. ग्रामपंचायतने १० टक्के निधी खर्च करून या उपाययोजना करणे गरजेचे आहे. निधी तर खर्च होतो पण तो केवळ कागदोपत्रीच प्रत्यक्षात अंगणवाडीत कोणत्याही मुलभुत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याचे तालुक्यातील वास्तव आहे. अंगणवाड्यांना अनेक गावात स्वत:च्या इमारती नाही. भाड्याच्या एखाद्या खोलीत, टिनपत्र्याच्या खाली घामाघुम झालेले बालके नको ती अंगणवाडी असेच म्हणत असतील. शौचालय नसल्यामुळे मदतनीस बालकांना उघड्यावर शौचास बदवितानाचे चित्र पहायला मिळते. सकाळी ९.३० वाजता मदतनीस सेविकेने अंगणवाडीत हजेरी लावणे क्रमप्राप्त आहे. त्या येतातही तर अंगणवाडी सेविकांनी १० वाजता अंगणवाडीत यायला पाहिजे. पण त्या येतात अगदी दुपारी १२ वाजताच्या सुमारास. सकाळी १० वाजता प्रार्थना घेणे, विद्यार्थ्यांचा परिचय करून देणे, पूर्व शालेय शिक्षणाचा भाग म्हणून गाणी, गोष्टी, अक्षरओळख व रंगाची ओळख करून देणे अंगणवाडी सेविकांचे कर्तव्य ठरते. पण वास्तवात अंगणवाडीत असे काही शिक्षण दिले जात नाही. स्नायुंची हालचाल होऊन आरोग्य सुदृढ व्हावे म्हणून खेळणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पण अनेक अंगणवाडींना प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील खेळणीच बेपत्ता असल्याचे दिसून आले. नास्त्याला चिवडा, मटकीचे, चवळीचे ऊसळ दिले जाते काय, हा संशोधनाचा विषय आहे. यावरही कडी म्हणजे पटावर मुलं दिसत असली तरी ती अंगणवाडीत मात्र दिसत नाही. सत्य तपासायचे असेल तर जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी एकदा तरी आकोली येथील अंगणवाडींना भेट द्यावी. सत्य काय ते उमगेल. मुलांची आरोग्य तपासणी कागदावर होते की प्रत्यक्षात हे सुध्दा तपासणे गरजेचे झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
पूर्व शालेय शिक्षण व कुपोषणमुक्ती एक दिवास्वप्नच
By admin | Updated: November 30, 2014 23:10 IST