आष्टी (श़) : स्थानिक ग्रा़पं़ अंतर्गत येणारा परिसर अनेक वर्षे विकासापासून दूर आहे़ नागरिक अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे़ नागरिकांना सुविधा पुरवून परिसराचा विकास करावा, अशी मागणी ग्रा़पं़ सदस्य अॅड. मनीष ठोंबरे व अजय लेकुरवाळे यांनी केली आहे़ याबाबत तहसीलदारांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़तालुक्यातील २०१२-१४ या आर्थिक वर्षात ओबीसी, बीपीएल प्रवर्गातील लाभार्थ्यांना वंचित न ठेवता घरकूल मंजूर करावे, तहसील कार्यालयाने वंचित ठेवलेल्या निराधारांना योजनेचा लाभ देण्यात यावा, शहराकरिता प्रलंबित एमआयडीसीचा प्रस्ताव मंजूर करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात याव्या, कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज पुरवठ्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, १९९७ पासून प्रलंबित पुलगाव-आमला रेल्वे मार्ग तयार करून रेल्वे सुरू करण्यात यावी, आष्टी संग्राम भूमी म्हणून इंग्रजकालीन पोलीस ठाण्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन पर्यटनस्थळ घोषित करावे, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व इतर सोयी-सुविधा देऊन त्वरित सुरू करावे, चिमूरप्रमाणे आष्टी शहीद दिवसाला शासकीय कार्यक्रम घेण्यात यावे, आदी समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली़ ग्रा़पं़ सदस्यांद्वारे निवेदनाच्या प्रती सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना पाठविण्यात आल्या आहे़ या मागण्या मान्य न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा मानस ग्रा़प़ सदस्यांनी व्यक्त केला आहे़ मागण्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
मागण्या प्रलंबित; ग्रा़पं़ सदस्यांचे निवेदन
By admin | Updated: August 12, 2014 23:54 IST