भूमी अभिलेखची चूक : आॅनलाईन ७/१२ मिळेनावर्धा : भूमि अभिलेख विभागाच्या चुकीमुळे दोन सर्व्हे क्रमांक एक झाले. परिणामी, नागरिक, शेतकऱ्यांना प्लॉट, शेती खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना अडचणी येत आहे. शिवाय आॅनलाईन सातबाराही मिळत नाही. ही चुक भूमि अभिलेख कार्यालयाद्वारेच दुरूस्त होऊ शकत असताना दुर्लक्ष केले जात आहे. भूमिअभिलेख विभागाने मोजणीत भूमापन क्रमांकांचे एकत्रितकरण केले. यामुळे महसूल विभागामार्फत त्या प्लॉटमध्ये सर्वे क्रमांकात डाटा अपडेट होत नसल्याने आॅनलाईन सातबारा मिळत नाही. हस्तलिखीत सातबारावर विक्रीही होत नाही. यामुळे प्लॉटधारक अडचणीत आले आहे. प्लॉटचा रेकॉर्ड आॅनलाईन झाला नाही. शासनाने विक्रीकरिता आॅनलाईन सातबारा अनिवार्य केल्याचे सांगितले जात आहे. आता सर्व्हे क्र. एकत्रिकरणामुळे त्यांची अडचण झाली आहे.गत काही महिन्यांपासून सदर प्लॉटधारक आॅनलाईन सातबारासाठी समस्त अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहे. यात संबंधित विभागांना निवेदने देण्यात आली. अनेकदा चर्चाही झाल्या; पण त्या प्लॉट धारकांना आश्वासना पलिकडे काहीही मिळाले नाही. या प्लॉट धारकांमध्ये बहुतांश अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांना पैशाची गरज आहे; पण प्लॉटची विक्री करता येत नाही. चुक भूमि अभिलेख विभागाची असताना मनस्ताप मात्र ग्राहकांना सोसावा लागत आहे. भूमि अभिलेखने चुकीची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी मनोहर तळवेकर, संजय भोमले, संजय खातदेवे, चौधरी, शेगावकर, रेहणकर, लंगडे, सोमनाथे, चरडे, कोल्हे, बडेवार, चंदेल, सातपुते आदींनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)
सर्व्हे क्रमांक एकत्रिकरणाचा शेतकऱ्यांना फटका
By admin | Updated: October 20, 2016 00:35 IST