जिल्ह्यात ७० टक्के कर्जवाटप : कारंजा तालुका केवळ ४८.०१ टक्क्यांवरचपराग मगर वर्धापीक कर्जाची उद्दिष्टपूर्ती १०० टक्के व्हावी यासाठी अग्रणी बँक प्रयत्नशील आहे. उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने सतत कर्ज वाटपाच्या मुदतीत वाढ केली जात आहे. एवढेच नव्हे तर आता शेतकऱ्यांना गरज असेल तेव्हा पीककर्ज दिले जाणार आहे. असे असतानाही अद्याप ७० टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कारंजा विभागात तर ५० टक्केही कर्जवाटप अद्याप झालेले नाही. यामुळे उद्दिष्टपूर्तीचे आव्हान अद्याप कायमच असल्याचे दिसते. जिल्ह्यातील ५४ हजार ४४९ खातेदारांना ६०५ कोटी पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांवर आहे. यापैकी एकूण ४३ हजार २५९ खातेदारांना आतापर्यंत ३८२ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. अद्याप ११ हजार १९० खारेदारांना कर्जवाटपाचे आव्हान अग्रणी बँकेवर आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती सध्या दयनीय आहे. खरीपाचा खर्च त्यांना करता यावा यासाठी राज्य शासनाने खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे; पण त्याची पूर्तता करताना अग्रणी बँकेच्या नाकी नऊ येत आहे. कर्जवाटपाची आकडेवारी पाहता आष्टी तालुक्यात ९४.४८ एवढे सर्वाधिक कर्जवाटप करण्यात आले आहे, तर कारंजा तालुक्यात सर्वात कमी केवळ ४८.०१ एवढेच पीक कर्ज वाटप झाले. त्यामुळे पीककर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट केव्हा पूर्ण होईल हा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यातील २२ बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. यामध्ये सर्वाधिक कर्जवाटप बँक आॅफ इंडियाने केले आहे. या बँकेने आतापर्यंत १७ हजार ४६ खातेदारांना १२० कोटी २० लाख एवढे कर्जवाटप केले आहे. त्या खालोखाल स्टेट बँक आॅफ इंडियाने ९ हजार २१५ खातेधारकांना ८८ कोटी ५१ लाख एवढे कर्जवाटप केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रने ४ हजार ६१५ खातेदारांना ५३ कोटी २९ लाख एवढे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दहा राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. असे असतानाही उद्दिष्टपूर्ती होण्यास अवकाश आहे. कारंजा, देवळी, हिंगणघाट या तालुक्यात अद्याप ६० टक्केही कर्जवाटप झालेले नाही. या तालुक्यातील बँकांवर काही कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे संबंधितांनी सांगितले. कर्ज वाटपात आष्टी तालुका सर्वात पुढे४जिल्हा अग्रणी बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १०० टक्के उद्दिष्ट एकाही विभागाने पूर्ण केलेले नसले तरी आष्टी विभाग कर्जवाटपात सर्वात पूढे आहे. या विभागात आतापर्यंत ९४.४८ टक्के कर्जवाटप झालेले आहे. त्या खालोखाल समुद्रपूर विभागात ८३.८४ टक्के, वर्धा विभागात ८१. १४ टक्के, आर्वी विभाग ७६.८२ टक्के, देवळी ५७.१० टक्के, हिंगणघाट ५४.६२ टक्के, कारंजा ४८.०१ तर सेलू विभागात आतापर्यंत ७३.५५ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.४यात कारंजा विभागात सर्वात कमी कर्जवाटप झालेले आहे. त्यामुळे या विभागातील बँक अधिकारी कर्जवाटप उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसते.आतापर्यंत बँकांनी केलेले कर्जवाटप४राष्ट्रीयकृत बँकांना दिलेल्या उद्दिष्टांमध्ये आतापर्यंत कॉर्पोरेशन बँकेने उद्दिष्टापेक्षाही जास्त सर्वाधिक असे १९१ टक्के कर्जवाटप केले आहे. शिवाय अलाहाबाद बँक ९२ टक्के, बँक आॅफ इंडिया ८०, युको बँक १५६, युनियन बँक १४३, विजया बँक १७०, आयसीआयसीआय १६० टक्के, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ७८ टक्के, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ६६ टक्के अशा प्रकारे खरीपाचे कर्ज वाटप करण्यात आले. यात काही बँकांचे उद्दिष्ट अतिशय सुमार असल्याचे दिसते.
पीककर्ज उद्दिष्टपूर्तीचे आव्हान कायम
By admin | Updated: July 30, 2015 01:51 IST