पटेल चौकाला फेरीवाल्यांचा वेढा : धुनिवाले चौकात वाहतुकीचा खोळंबालोकमत संडे स्पेशलवर्धा : शहरातील चौकांची दैनाच असल्याचे दिसून आले आहे. यातही पटेल चौक व धुनिवाले मठ चौकात छोट्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ हातबंडी धरकांची गर्दी असल्याने येथे वाहतुकीची अव्यवस्था असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हापरिषदेकडे जात असलेल्या मार्गावरील महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सर्वांचे लक्ष वेधणारे चौक आहेत. या चौकात लावण्यात येत असलेल्या पत्रकांमुळे बकालपणा पसरत असल्याचे चित्र आहे.बजाज चौकात जमनालाल बजाज यांचा पुतळा बसविण्याकरिता हटविण्यात आलेला राणीलक्ष्मीबाई यांचा पुतळा मुख्य डाक विभागाच्या चौकात बसविण्यात आला आहे. तिथेही तो एका कोपऱ्यात आहे. या चौकाला त्यांचे नाव कागदोपत्रीच असल्याचे दिसून आले आहे. चौकाला अद्यापही मुख्य पोस्ट आॅफीस चौक वा दूरसंचारच्या कार्यालयाच्या नावानेच ओळखल्या जात आहेत. राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्यालगत वृक्षलागवड करण्यात आली असून त्याकडे पालिकेच्यावतीने पाहिल्या जात नसल्याने येथे कचरा जमा झाला आहे. शिवाय पुतळ्याच्या आसपास फेरीवाले राहत असल्याने येथे अव्यवस्था निर्माण झाली आहे. शहराच्या विकासाकरिता या चौकांचा विकास होणे गरजेचे आहे. पालिकेसह जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.