वर्धेत सोमवारी प्रारंभ : आरोग्य विभागामार्फत ग्रामीण तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून शहरी भागात अंमलबजावणी वर्धा : दिवसेंदिवस बदलत्या वातावरणामुळे नवनवे आजार बळावत आहेत. या जीवघेण्या विविध आजारापासून बालकांना मुक्त ठेवण्याकरिता विविध लसी देण्यात येत आहेत. या लसी सर्वसामान्यांना आर्थिक दृष्ट्या न परवडणाऱ्या असल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून शासनाच्यावतीने पाच लसी मिळून एक लस निर्माण केली आहे. या लसीला ‘पेंटाव्हॅलंट’ असे नाव देण्यात आले. ती लस वर्धा जिल्ह्यात सोमवारपासून बालकांना देण्यात येणार आहे. बालकांना लस देताना ती कमी पडू नये म्हणून जिल्ह्यात एकूण २१ हजार ३०० लसी पुरविण्यात आल्या आहेत. या लसी दोन महिने पुरेल अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यातील एक हजार लसी जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित लसी ग्रामीण भागात जेथे लसीकरणाची केंद्र आहेत तिथे देण्यात आल्याची माहिती आहे. घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यासाठी डीपीटी, कावीळसाठी हिपेटायटीस बी व अन्य लसी बालकांना द्याव्या लागत होत्या. यातील बहुतांश लसींचे तीन ते पाच डोस बालकांना द्यावे लागत होते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लसीसाठी बालकांना ‘इंजेक्ट’ करावे लागत होते. यावर तोडगा म्हणून आता कावीळ, घटसर्प (डिप्थेरिया), डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदूज्वर (हिमोफिलस एंल्फूएंझा बी) या पाच आजारांसाठी एकच लस शोधून काढण्यात आली आहे. ‘पेंटाव्हॅलंट’ ही लस प्रथमच शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असून सामान्यांना उपयोगी पडणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभागाच्यावतीने ही लस बालकांना दिली जाणार आहे. यात सहा, दहा आणि १५ आठवड्यांमध्ये बालकांना तीनही डोस दिले जाणार आहेत. ही लस एक वर्षापर्यंतच्या बालकांना देता येणार आहे. सर्व रोगांवर एक लस घ्यावयाची असल्यास खासगी रुग्णालयांमध्ये अधिक रक्कम मोजावी लागत होती. आता शासनानेही पाच आजारांसाठी एक लस उपलब्ध करून दिल्याने सामान्य नागरिकांना आपल्या बाळांना या जीवघेण्या आजारांपासून दूर ठेवता येणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी) शासनाच्यावतीने पाच आजारांवर बालकांना देण्यात येत असलेल्या लसीचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्याला २१ हजार ३०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. यातील एक हजार लसी जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. इतर लसी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. उपलब्ध असलेला साठा दोन महिने पुरणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’मध्ये ८९ वंचित बालकांचे लसीकरण गोरगरीब तसेच तळागाळातील कुटुंबांमध्ये असलेल्या बालकांना लसीकरण उपलब्ध होत नाही. लसीकरण न झाल्यास बालकांतील आजारपण वाढत असून अपंगत्व येण्याची शक्यता असते. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे ‘मिशन इंद्रधनुष्य’ ही लसीकरण मोहीम आॅक्टोबर महिन्यात राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या ८९ बालकांना लस देण्यात आली आहे.जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सामान्य रुग्णालयामार्फत १७ बालके शोधून त्यांना लस देण्यात आल्या. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामार्फत ३२, आर्वी उपजिल्हा रुग्णालयामार्फत आठ तर पुलगाव ग्रामीण रुग्णालयामार्फत ३२ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे लसीकरणापासून वंचित वा काही लसी देणे राहिलेल्या बालकांचे संपूर्ण लसीकरण होणार आहे. यामुळे ही योजना सर्व घटकांसाठी उपयुक्त ठरणारीच आहे.मिशन इंद्रधनुष्य या मोहिमेकरिता पाच मोबाईल पथके तयार करण्यात आली होती. वर्धा, पुलगाव व आर्वी येथे प्रत्येकी एका पथकाने तर हिंगणघाट येथे दोन पथकाने लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेत त्यांचे लसीकरण केले. यात नऊ ते बारा महिने आणि बारा ते २३ महिने या वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना टीटी, बीसीजी, ओपीव्ही वन, डीपीटी, हिपेटायटीस बी वन, जेई वन, व्हीटॅमीन ए वन आदी प्रकारच्या लसी देण्यात आल्या आहेत. ही योजना अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाच आजारांवर चिमुकल्यांकरिता ‘पेंटाव्हॅलंट’चे एकच इंजेक्शन
By admin | Updated: November 23, 2015 01:49 IST