वर्धा : खरीप हंगाम सुरू झाल्यापासून कपाशीचे पीक विविध संकटांचा सामना करीत आहे. या पिकाच्या अवस्थेमुळे कापूस उत्पादक त्रस्त झाले़ या शेती हंगामात आतापर्यंतचा पावसाचा लहरीपणा कपाशीला प्रभावित करणारा ठरला़ सध्या कोरडवाहू खारपान पट्ट्यात कपाशीची बोंड परिपक्व होत आहे़ यामुळे दिवाळीत यंदा शेतकऱ्यांच्या घरी पेटणाऱ्या दिव्यांमध्ये जुन्याच कापसाच्या वाती राहतील, हे वास्तव शेतकरी बोलून दाखवितात़ यंदा खरीप तथा रबी हंगाम शेतकऱ्यांसाठी मृजवळ ठरले़ खरीपाच्या पेरण्या उशीरा झाल्या. त्यातच अनेक शेतांत भूजिया भुंग्याने अंकुरलेले कपाशीचे कोंब कुरतडले होते. शेतकऱ्यांना प्रारंभीच या संकटांच्या उपाययोजनेवर मोठा खर्च करावा लागला़ यानंतर कपाशीला पाण्याचा ताण सहन करावा लागला. यातच कपाशीवर रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव जाणवत होता. एकीकडे कीटकनाशकांची फवारणी सुरू होती तर दुसरीकडे संरक्षित कपाशीला तुषार संचाद्वारे पाणी दिले जात होते. काही दिवसांनी पावसाचे सत्र सुरू झाले. यामुळे कपाशीच्या शेतातील मशगतीची कामे थांबली़ शेतात पाणी साचून होते. डवरण व निंदण न झाल्याने कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला होता. पावसाचे वातावरण दूर होताच कपाशीवर फुलकीडे, तुडतुडे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला़ यावेळी शेतकऱ्यांची फवारणी पांढऱ्या माशीपुढे बेअसर ठरल्याचे शेतकरी सांगतात. पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणीची कामे करावी लागली. हिरवीगार कपाशीची पाने आता लालसर होत आहे़ लाल्या आल्याने कपाशीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बागायती शेती क्षेत्रात शेतकऱ्यांना पूर्ण हंगामी कपाशीची लागवड केली होती. अशा शेतकऱ्यांच्या घरात सध्या कापूस आला आहे. शेतांत कापूस वेचणीची कामे मजुरांकडून केली जात आहेत; पण कोरडवाहू खारपान पट्ट्यात कपाशीचे बोंड परिपक्व होत आहे़ दसरा गेला, दिवाळी आली तरी शेतकऱ्यांच्या घरात कापूस येण्याची चिन्हे नाहीत. शिवाय परतीचा पाऊस नसल्याने उत्पादन घटणार असल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)
दिवाळीमध्ये पेटणार जुन्याच कापसाच्या वाती
By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST