लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाने नवी उच्चांकी गाठल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल ३३२ नवीन कोविड पॉझिटिव्ह आढळले असून यात १९२ पुरुष तर १४० महिलांचा समावेश आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. कोरोनाबाबत अजूनही वर्धेकर गंभीर नसल्याने जिल्हा प्रशासन कठोर निर्बंध लादण्याच्या मानसिकतेत असल्याचे खात्रादायक सूत्रांनी सांगितले.नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील १९१, हिंगणघाट तालुक्यातील २८ देवळी तालुक्यातील ४४, आर्वी तालुक्यातील ३५, आष्टी तालुक्यातील ११, कारंजा तालुक्यातील सहा, समुद्रपूर तालुक्यातील सहा तर सेलू तालुक्यातील अकरा रहिवाशांचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ३३२ नवीन कोविड बाधितांची भर पडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता १६ हजार ३९ झाली आहे. तर शुक्रवारी वर्धा तालुक्यातील ७६ वर्षीय पुरुषाचा कोविड-१९ विषाणूने बळी घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४०१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ५५४ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यापैकी अर्ध्याहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या गृहअलगीकरणात आहेत. तर केवळ गंभीर लक्षणे असलेले कोविडबाधित कोविड रुग्णालयात आहेत. प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी प्रत्येक व्यक्तीने सध्याच्या कोरोना संकटात दक्ष राहण्याची गरज आहे.
चार व्यक्ती देताहेत मृत्यूशी झुंजजिल्ह्यात दिवसेंदिवस नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. ॲक्टिव्ह कोविड बाधितांपैकी सुमारे ४३० कोविड बाधित रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी ५१ व्यक्ती आयसीयूत आहेत. तर चार व्यक्ती सध्या व्हेंटिलेटरवर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.