फनिंद्र रघाटाटे - रोहणाजिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हायस्कूल विभागात बढतीसाठी पात्र आहेत. त्यांना बढती न देता नवीन भरतीस परवानगी देत मान्यता देण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडून जिल्ह्यात होत असलेली ही कृती संशयास्पद असून कार्यरत व पात्र शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप होत आहे. शाळा संहिता सन १९७७ व १९८१ अन्वये कोणत्याही शाळेत मिडलस्कूलमध्ये पदवीधर प्रशिक्षित शिक्षक कार्यरत असेल व हायस्कूल विभागात पद रिक्त असेल तर रिक्त पद भरताना मिडस्कूलमधील प्रशिक्षित पदवीधर असलेल्या पात्र शिक्षकांना हायस्कूल विभागात प्रथम बढती द्यावी व मिडलस्कूल विभागातील पद सरळ भरतीने भरावे, अशी स्पष्ट तरतूद आहे. वर्धा जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळेत मिडलस्कूल विभागातून हायस्कूल विभागात बढतीसाठी पात्र शिक्षक असताना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाने अनेक शाळा व्यवस्थापनांना हायस्कूल विभागातील रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली. या विरोधात बढतीस पात्र शिक्षकांनी तक्रार केली. काही अन्यायग्रस्त शिक्षकांची याबाबतची तक्रार शिक्षण उपसंचालक नागपूर यांना केली होती. उपसंचालक कार्यालयाच्यावतीने आधी पात्र शिक्षकांना बढती द्या, मगच सरळ नियुक्तीने पद भरा या आशयाचे पत्र माध्यमिक शिक्षण विभागाला पाठविण्यात आले. पण शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाने नियमाला तिलांजली देत अशा सर्व शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देवून बढतीस पात्र शिक्षकांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे.
पात्र शिक्षकांना डावलून नवीन भरती
By admin | Updated: September 14, 2014 00:06 IST