विलास कांबळे : माहिती अभियान व पंचायतराज कार्यशाळा, सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थितीवर्धा : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. सर्व विभागाने एकत्रिपणे योजनांच्या लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचविल्यास विकासाचे उद्दिष्ट गाठणे सहज शक्य आहे. शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी केले.विकास भवन येथे शुक्रवारी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित माहिती अभियान व पंचायतराज दिनानिमत्त सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड, सेलूच्या पंचायत समितीच्या सभापती मंजुषा दुधबळे, शैलेश पांडे आणि पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी व्ही.आर. पाटील, राजेंद्र भूयार, सुनील मेसरे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना यांनी जलयुक्त शिवार, घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या योजनांचा अभ्यास करून कशा प्रभावीपणे राबविता येतील यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून विचारमंथन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासनाचा विविध योजना प्रभावीपणे राबवण्यिासाठी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधीचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.विविध योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त सहभाग असल्यास गावांचे चित्र बदलू शकते, असे सांगताना माहिती संचालक मोहन राठोड महणाले, की योजनांची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांचा विश्वास संपादन करणे आणि योजनांद्वारे आपल्या गावाच्या विकास कसा होईल याबद्दल जनमत तयार करण्याची आवश्यकता आहे. गावातील प्रत्येक घटकांला लाभ देण्यासाठी ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कार्य करावे, असेही ते यावेळी म्हणाले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना शैलेश पांडे म्हणाले की, पंचायतराज व्यवस्था ही भारतामध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. परंतु इंग्रजांनी या व्यवस्था मोडकळीस आणल्यामुळे ग्रामीण भागातील संवादी प्रक्रिया थांबली असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले, ७३ व्या घटना दुरूस्तीमुळे ग्रामीणस्तरावर लोकशाहीकरण आणि ग्रामसभेला अधिकार देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे जगात सर्वाधिक ३० लक्ष प्रतिनिधी निवडून येऊ लागले. ग्रामसेवक आणि तलाठी यांनी ग्रामीण भागात विकासाचे वातावरण तयार करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी संवादाचे माध्यम बनावे आणि गावातील चावडीची परंपरा सुरू करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.माहिती कार्यालयाच्या माहिती अभियान या उपक्रमामुळे योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याची उत्तम संधी उलपब्ध होत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.सेलू पंचायत समितीच्या सभापती मंजुषा दुधपोहळे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, राजेंद्र भूयार, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी भालेराव, महिला व बालकल्याण विकास अधिकारी मनिषा कुलसंगे, महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुनील मेसरे, कृषी तज्ज्ञ डॉ. नेमाडे, पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी व्ही.आर. पाटील आदींनी सरपंच व ग्रामसेवकांशी संवाद साधला. प्रास्ताविक व स्वागत जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. संचालन विनेश काकडे यांनी केले. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.(प्रतिनिधी)समाजसेवा म्हणून योजनांची माहिती द्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आहेत. त्यांचा लाभ मिळविण्यासाठी योजनांचा अभ्यास करणे आवश्यक असून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी योजनांची अंमलबजावणी करताना समाजसेवेच्या भावनेतून काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपाध्यक्ष कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले.
योजनांच्या माध्यमातून विकासाला नवी दिशा
By admin | Updated: April 25, 2015 00:02 IST