वर्धा : कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्री-पुरूष समानता ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले.पोलीस मुख्यालयातील आशीर्वाद भवन येथे पुनर्भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महिला व मुलांकरिता असलेल्या सहायता कक्षाला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कक्ष आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला कक्षाच्या नागपूर आणि नांदेड विभागाच्या विभागीय समन्वयक प्रतीभा गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सोनोने, जिल्हा व सत्र न्यायालयातील बार असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. अरुणा खरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रकाश बेहरे, डॉ. कासारे, डॉ. खैरकार आदी उपस्थित होते. यावेळी ‘महिलांबाबत फौजदारी कायद्यात पोलिसांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले़ याबाबत मार्गदर्शन करताना पारस्कर यांनी महिला व मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील राहून त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज प्रतिपादीत केली़ अॅड. खरे यांनी महिला अत्याचार व संबंधित फौजदारी कायदे, सुधारणा २०१३ विषयावर मार्गदर्शन केले. महिलांचे मानसिक स्वास्थ व संबंधित महिला हिंसाचार विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ बेहरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सोनोने, डॉ. कासारे, डॉ. खैरकार यांनीही महिला सक्षमीकरणावर विचार व्यक्त केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ प्रास्ताविक महिला कक्षाच्या विभागीय समन्वयक गजभिये यांनी केले. संचालन सुनीता झांबरे यांनी केले तर आभार प्रिया हुकमे यांनी मानले. कार्यक्रमाला सुधाकर ढोमणे, विनोद खंडारे, सुरेखा खापर्डे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)
कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी पुढाकाराची गरज
By admin | Updated: July 27, 2014 00:14 IST