काही ठिकाणी तुरळक : चार ठिकाणी वीज पडून नुकसानवर्धा : विद्युल्लतेच्या कडकडाटासह जिल्ह्यात कोसळलेल्या जलधारांनी शेतकऱ्यांना सुखावले़ काही प्रमाणात का होईना पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतपिकांना नवसंजीवणी मिळणार आहे़ दरम्यान, जिल्ह्यात चार ठिकाणी वीज पडली़ यात समुद्रपूर व पवनार येथे कुठलेही नुकसान झाले नसले तरी सेलू तालुक्यातील रेहकी येथे वीज पडल्याने विद्युत उपकरणांचे नुकसान झाले़ घोराड येथेही वीज कोसळली; पण नुकसान झाले नाही़गत एक महिन्यापासून जिल्ह्यात पावसाचा थेंब नव्हता़ पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतातुर होते़ शिवाय श्रावण महिन्यातील वातावरण त्यात भर घालत होते़ उन्हाचा तडाखा व दमट वातावरणामुळे गर्मी वाढली होती़ पावसाच्या दडीमुळे पिकांची दयनिय अवस्था झाली होती़ शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी स्प्रिंकलरचा आधार घ्यावा लागला होता़ कोरडवाहू शेतकऱ्यांची तर गळचेपीच झाली होती़ अनेकांनी मजुरांच्या साह्याने पिकांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला; पण तो अत्यंत अपुरा पडत होता़ आणखी काही दिवस पाऊस आला नसता तर पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढले असते़ थोडा का होईना; पण पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ वातावरणातील गर्मी कमी झाली नसली तरी पिकांना या पावसामुळे संजीवणी मिळणार आहे़मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील सेलू, आर्वी, हिंगणघाट, देवळी, वर्धा, समुद्रपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली़ रात्रभर विजेचा कडकडाट सुरू होता; पण विशेष जलधारा कोसळल्या नाही़ समुद्रपूर येथे शेतात वीज कोसळली़ यात नुकसान झाले नाही़ सेलू तालुक्यातील रेहकी येथे भरवस्तीत वीज पडल्याने नागरिकांचे नुकसान झाले़ पवनार येथेही शेतात वीज कोसळली़ यात कपाशीची ७० ते ८० झाडे जळालीत़ वीज पडल्याने कुठेही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही़(लोकमत न्यूज नेटवर्क)
पावसाचे पुनरागमन पिकांना नवसंजीवनी
By admin | Updated: August 20, 2014 23:41 IST