महिनाभराची तयारी पूर्णत्वास : सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनही सज्जवर्धा : ‘एक मराठा, लाख मराठा’ या उद्घोषाने गत महिनाभरापासून जिल्ह्यात मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाची तयारी केली. आयोजकांकडून केलेल्या या तयारीचे फलित रविवारी वर्धेकरांना प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. ऐतिहासिक ठरणाऱ्या या मोर्चाचे दृश्य डोळ्यात साठविण्याकरिता वर्धेकर आसूसले आहेत. याकरिता वर्धानगरीही सज्ज झाली आहे. महिलांच्या नेतृत्त्वात पार पडणाऱ्या या मूकमोर्चात सहभागी होणाऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. वर्धेतील जुन्या आरटीओ मैदानातून दुपारी १२ वाजता या ऐतिहासिक मूकमोर्चाला प्रारंभ होणार आहे. या मैदानावर नागरिकांकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तत्पूर्वी आयोजकांकडून या मोर्चात नागरिकांनी सहभागी होण्याकरिता गावपातळीवरही सभा घेण्यात आल्या. सभांना मिळालेल्या उर्त्स्फूत प्रतिसादावरून हा मूकमोर्चा वर्धेत गर्दीचा नवा अध्याय लिहिणार असल्याची वातावरण निर्मिती झाली आहे. शहरात लागलेले मोठ-मोठे फलक, स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या ‘एक मराठा, लाख मराठा’ लिहिलेल्या काळ्या रंगाच्या टी-शर्ट यामुळे मूकमोर्चाचे वेगळेपण बघायला मिळणार आहे. जुन्या आरटीओ मैदानातून प्रारंभ होणाऱ्या या मूकमोर्चात सहभागींकरिता विशेष स्थान ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे एक शिस्तबद्ध मोर्चा वर्धेकरांना बघायला मिळणार आहे. तर मूकमोर्चात सहभागी महिला-पुरूषांना काही त्रास होणार नाही याची दक्षताही आयोजकांसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली आहे. या मोर्चात बाहेर गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक येणार असल्याने शहराच्या बाहेरच पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. त्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आयोजकांना दिली असून ती आयोजन समितीत असलेल्या पार्किंग समितीने संबंधितांना दिली आहे. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होणार नाही. शिवाय ज्या मार्गे हा मूकमोर्चा जाणार आहे, त्या मार्गावरील इतर वाहतूक वळती करण्यात आली आहे. मोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. येथे पोहोचल्यानंतर पुरूषांची व्यवस्था पोलीस विभागाच्या हॉकी मैदानावर तर महिलांची व्यवस्था क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाने आज वर्धेत घडणार इतिहास
By admin | Updated: October 23, 2016 02:22 IST