रोहणा : गत तीन दिवस सुरू राहिलेल्या संततधार पावसाने व लोअर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडे केले़ यामुळे वर्धा, भोलेश्वरी नदी व परिसरातील नाल्यांना आलेल्या पुराने नदी-नाल्याच्या काठावरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले़ आधी अपूऱ्या पावसाने दुबार, तिबार पेरणी तर आता अतिपावसाने नुकतेच जमिनीत अंकुरलेले शेतपिकांचे रोपटे खराब झाले़ यामुळे रोहणा, दिघी, सायखेडा, वडगाव, वाई, धनोडी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ गत तीन दिवस संपूर्ण विदर्भात झालेल्या संततधार अतिवृष्टीने नदी-नाले ओसंडून वाहत आहे. त्यातच लोअर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने नदी-नाल्यांत पुराचे पाणी सामाऊ शकले नाही. परिणामी, पुराचे पाणी नदी-नाल्यांच्या काठावर असलेल्या हजारो एकर शेतजमिनीतून वाहते़ यामुळे शेतातील नुकतेच अंकूरलेल्या शेतपिकांची रोपटी नष्ट झाली. अपूऱ्या पावसाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली होती. नंतर आलेल्या बऱ्यापैकी पावसाने रोहणा परिसरातील सर्व गावांत शेतकऱ्यांनी शेतातील कापूस, तूर व सोयाबीन पिकांची पेरणी आटोपली़ काहींची पिके जमिनीवर येऊन ताशी लागली होती तर काहींची पिके जमिनीत अंकुरलेली होती. या पिकांपैकी जी शेते नदी-नाल्याच्या काठावर होती, त्या शेतातून पूराचे पाणी वाहून गेल्याने पिके खरडून गेली. यात दिघी, सायखेड व वडगावच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ अनेक सखल भागातील शेतात पाणी साचून त्याचे शेततळ्यांत रुपांतर झाल्याने शेतात अंकुरली पिके सडण्याची भीती आहे. तूर पिकाचे अधिक नुकसान आहे. शासनाने त्वरित नुकसानीचा सर्व्हे करून कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत अनुदान वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)
संततधार पावसाने शेतपिकांचे नुकसान
By admin | Updated: July 25, 2014 00:00 IST