जिल्ह्यात नऊ पथके : ८७५ कृषी केंद्र परवानाधारक; काळ्याबाजारावर लक्ष वर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले. याकरिता बाजारात बियाण्यांची खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. या दिवसात कृषी केंद्र चालकांकडून बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. हा काळाबाजार रोखण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ पथके तयार केली आहेत. या पथकात एकूण ३० कर्मचारी असून त्यांचे लक्ष कृषी केंद्रात होत असलेल्या काळाबाजारावर राहणार आहे.अशातच शासकीय बियाणे पुरविणारी कंपनी म्हणून नोंद असलेल्या महाबीजने जिल्ह्यात बियाणे पुरविण्याकरिता असमर्थता दाखविली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याचे संकेत असताना कृषी विभागाच्यावतीने त्यांना सोयाबीनच्या २५ हजार क्विंटल बियण्यांची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून केवळ आठ हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी कंपनीच्या बियाण्यांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. हंगामाच्या तोंडावर बाजारात बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची गर्दी होणे स्वाभाविक असताना त्यांची लुट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामात एखाद्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी होते. याचाच लाभ उचलत कृषी केंद्र चालकांकडून त्याची लुट होण्याची शक्यता आहे. शिवाय खतांची लिकींग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आळा घालण्याकरिता कृषी विभागाकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बियाण्यांचा होणारा काळाबाजार, खतांची लिंकींग रोखण्याकरिता कृषी विभागाकडून एकूण नऊ पथके तयार तयार करण्यात आली आहेत. यात आठ तालुका स्तरावर तर एक जिल्हास्तरावर कार्यरत राहणार आहे. या पथकात एकूण ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांची नजर जिल्ह्यातील ८७५ कृषी केंद्रावर राहणार आहे. कोणत्याही कृषी केंद्रचालकाकडून बियाणे किंवा खतासंदर्भात शेतकऱ्यांची लूट होत असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी) गत हंगामात केले होते १७ परवाने निलंबितजिल्ह्यात कार्यरत या पथकाने केलेल्या कारवाईत गत हंगामात १७ परवाने निलंबित करण्यात आले होते. यात खतांचा व्यवसाय करणारे सहा, बियाणे विक्रीचे सहा आणि किटकनाशक विक्री करणाऱ्या पाच व्यावसायिकांचा समावेश आहे. अद्यापही त्यांना नुतनीकरण करणे शक्य झाले नाही. ६९ परवाने रद्दची कारवाई बियाणे व खत विक्री करताना गडबड केलेल्या एकूण ६९ व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले होते. यात बियाणे विक्रीची २५, खत विक्रीची २० तर किटकनाशक विक्री करणाऱ्या २४ व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यांना अद्यापही खतांची विक्री करण्याची मुभा देण्यात आली नसल्याची माहिती आहे.
३० कर्मचाऱ्यांची कृषी केंद्रांवर करडी नजर
By admin | Updated: June 24, 2016 02:11 IST