शहरवासीयांची मागणी : कर्मचाऱ्यांचीही कमतरता कारंजा (घा.) : सद्यपरिस्थितीत विद्युत वितरण कंपनीने कारंजा शहर व इतर १५ गावांना मिळून विद्युत सेवा देण्याकरिता कारंजा सबस्टेशन दिलेले आहे. पण कामाचा व्याप, गावांची संख्या आणि वाढती वीज मागणी लक्षात घेता कारंजा शहराकरिता एक स्वतंत्र सबस्टेशन तर इतर १५ गावाकरिता दुसरे स्वतंत्र सबस्टेशन देण्यात यावे, अशी मागणी कारंजावासीयांनी तालुका ग्राहक पंचायतमार्फत संबंधितांकडे केली आहे. इंदिरा नगर परिसरातील कारंजा सबस्टेशनला सध्या कारंजा या १५ हजार लोकसंख्येच्या गावासह नारा, आजनादेवी, सावरडोह, बेलगाव, खापरी, वाघोडा, तरोडा, काकडा, परसोडी, बिहाडी, मदनी, खैरी, सेलगाव (लवणे), चंदेवानी, गोदनी अशी पंधरा गावे जोडलेली आहे. कारंजात ४ हजार विद्युत ग्राहक व १०० कृषी ग्राहक आहेत. त्याचप्रमाणे १५ गावातसुद्धा ४ हजार ५०० विद्युत ग्राहक आणि १०० कृषी ग्राहक आहे. एवढ्या ८ हजार ५०० विद्युत ग्राहक आणि २०० कृषी ग्राहकांचा कारभार सांभाळणे आणि तत्पर सेवा देणे उपअभियंता आणि कर्मचाऱ्यांना कठीण जात आहे. वीजपुरवठा व्यवस्थित न होण्याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. आधीच कमी पावसामुळे ओलीत करणे गरजेचे झाले आहे. परंतु एकाच सबस्टेशनमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ओलितास अडचणी येत आहे.कारंजा शहरात पोलीस स्टेशन, तीन कॉलेज, पाच शाळा, दवाखाना, तहसील, कृषी विभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, अशी महत्त्वाची कार्यालये आहे. या सर्व कार्यालयाना तत्पर व सलग विद्युत सेवा देणे गरजेचे असते. त्यामुळे ही मागणी होत आहे.ही सेवा एकच सबस्टेशन, कामाचा व्याप व ग्राहकांची वाढती संख्या यामुळे योग्य प्रकारे देता येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा कमी असल्यामुळे हा त्रास होत आहे. या दृष्टीने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
कारंजाला हवे स्वतंत्र सबस्टेशन
By admin | Updated: August 14, 2014 00:02 IST