लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याचे वास्तव असले तरी हे प्रमाण तक्रारींची संख्या वाढत असल्याने दिसून येत आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.ठाकरे पुढे म्हणाल्या, महिला कैदी व त्यांच्या समस्या या विषयाला अनुसरून राज्य महिला आयोगाचे प्रत्येक सदस्य कारागृहांना भेटी देवून आपला अहवाल तयार करणार आहेत. तो अहवाल आपणही तयार करणार असून त्या निमित्ताने आतापर्यंत आपण अकोला, अमरावती, नागपूर व आज वर्धा येथील कारागृहाची पाहणी करीत महिला कैद्यांशी संवाद साधला. पुढील काही दिवसांमध्ये आपण भंडारा व चंद्रपूर येथील कारागृहात जावून पाहणी करीत महिला कैद्यांची संवाद साधणार आहे. वर्धा कारागृहाची क्षमता २५२ इतकी असून सध्या या कारागृहात ३४३ कैदी आहेत. येथील व्यवस्था ठिकठाक असल्याचे आमच्या पाहणी दरम्यान निदर्शनास आले आहे. आपल्याकडे देण्यात आलेल्या सहा जिल्ह्यापैकी वर्धा व चंद्रपूर हे दोन जिल्हे दारूबंदी असलेले आहेत. महिलांवरील वाढत्या अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये दारू व दारूची व्यसनाधिनता हा महत्त्वाचा विषय ठरत असल्याने दारूबंदीविषयीचे मत आपण आपल्या अहवालात मांडणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंतच्या पाहणीत वर्धा व अकोला येथील कारागृहात स्थायी वैद्यकीय अधिकारी असणे क्रमप्राप्त आहे, असे निदर्शनास आले आहे. असे असले तरी वर्धा येथील कारागृहात नियमित वैद्यकीय अधिकारी भेटी देत कैद्यांची आरोग्य तपासणी करतात. महिलांकडून पोलीस कचेरीत दिल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींबाबत बोलताना ठाकरे म्हणाल्या की, अनेक महिलांकडून सध्या बऱ्यापैकी त्यांच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा वापर करून पुरुषांविरुद्ध खोट्या तक्रारी पोलीस कचेरीत दाखल केल्या जात असल्याचे आपणही मान्य करतो. गुन्हा दाखल करताना पोलिसांनी सुरूवातीला थोडी चौकशी करणे गरजेचे आहे. कुणावरही अन्याय होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, अर्चना वानखेडे, अॅड. अनिता ठाकरे, संगीता वानखेडे आदींची उपस्थिती होती.
महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:25 IST
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याचे वास्तव असले तरी हे प्रमाण तक्रारींची संख्या वाढत असल्याने दिसून येत आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतीवरच
ठळक मुद्देनीता ठाकरे : पत्रपरिषदेत दिली माहिती