प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणी शेतात शिरण्याची भीती; शेतकर्यांची तहसीलदारांकडे तक्रार
वर्धा : तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथे असलेल्या नाल्यातून येथील विटभट्टी मालक उत्खनन करीत आहेत. होत असलेल्या मातीच्या या उत्खननामुळे नाल्याचे पात्र वाढत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नाल्यातील पाणी शेतात जाण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. या संबंधी येथील शेतकर्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असली तरी त्यांच्याकडून काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. उन्हाळ्याच्या दिवसात विटभट्टी व्यवसाय जोरात असतो. या व्यावसायिकांना विटांकरिता लागत असलेली माती विकत घ्याची लागते. मात्र वर्धेत ढिसाळ पडलेल्या प्रशासनामुळे सारेच अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. यात वर्धा तालुक्यातही अनेक जण विटभट्टीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडून शासनाला कोणताही महसूल मिळत नसून या भट्टीमालकांकडून मोठ्या प्रमाणात मातीची चोरी होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. तालुक्यात येत असलेल्या जंगलव्याप्त भागातील झुडपी जंगलातून मातीचे उत्खनन झाले आहे. यावर वनविभागाने अंकुश लावला असून भट्टी मालकांनी आता त्यांचा मोर्चा नदी नाल्यांकडे वळविला आहे.
खरांगणा (गोडे) येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात मातीचा उपसा करण्यात येत आहे. याची काही शेतकर्यांनी वर्धा तहसीलदारांकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीवर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात या शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे घोव घेतली असली तरी त्यांच्याकडूनही कारवाई करण्यात आली नाही. या नाल्यातून होत असलेल्या मातीच्या उत्खननामुळे येत्या दिवसात परिसरातील शेतकर्यांच्या शेतात पाणी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)