फनिंद्र रघाटाटे - रोहणासोयाबीन कापणीचा खर्च निघु शकेल एवढाही उतारा नसल्याने अनेकांनी शेतात जनावरे सोडली तर बी.टी. कापूस रोगाला बळी पडत नाही असे ठणकावून सांगणाऱ्या बियाणे कंपन्या मुग गिळून आहेत. कापसावर आलेला लाल्या व पांढऱ्या माशीच्या हल्ल्याने दोन वेच्यात कापसाची उलंगवाडी होणार आहे. अशात जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक काढल्याने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार होत असल्याची ओरड आहे. शेतात असलेल्या कपाशीच्या पिकावरून सरासरी दोन ते तीन क्विंटल प्रति एकर उतारा मिळण्याची आशा आहे. पेरणीनंतर पावसाने मारलेल्या दडीत तुरीची रोपटे पाखरांनी खाऊन फस्त केलीत. त्यामुळे तुरीचे पीकही पन्नास टक्के घटणार आहे. अशी सर्व परिस्थिती असताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्वच भागातील नजर अंदाज आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे शासनाला कळवून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचे मार्ग बंद केले आहेत. आहे. बी.टी. कापसाची पाती गळत नाही. झाडाला जेवढी पाती येते त्याची बोंडे होतात. फार फवारणीची गरज पडत नाही. झाड उत्पादन क्षम होईपर्यंत बीटीवर कोणताच रोग येत नाही, असे सांगत शेतकऱ्यांना भूरळ पाडण्यात आली. अशात १५ आॅक्टोंबरला झालेल्या पावसापासून कपाशीच्या झाडावरील पाती गळणे सुरू झाले तर आठ दिवसात झाडावर पाती दिसेनासी झाली व लाल्यासह पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावाने कापसाचे पीक लाल आले आहे. पक्व झालेली बोंडे फुटेल तेवढा कापूस घरी येईल त्यातही मजूर कापूस वेचणीसाठी १०० ते १५० रुपयांपर्यंत मजुरी मागत आहेत. कापसाला भाव साडेतीन हजार रुपये मिळणार असेल तर एकरी दोन व तीन क्विंटल उत्पन्नात झालेला खर्च कसा निघणार या विवंचनेत बळीराजा आहे. असे असतानाच महसूल विभागाने नजर आणेवारी पन्नास पैश्यापेक्षा अधिक काढल्याची माहिती बाहेर आली अन् शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ झाली. शासनाच्या महसूूल विभागाने बसल्याबसल्या आणेवारी काढण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक परिस्थितीच्या वास्तवतेची जाणीव करून घ्यावी अशी मागणी समस्त शेतकरी करीत आहेत.
नजरअंदाज आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त
By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST