हरिदास ढोक देवळीमहालक्ष्मी स्टिल इंडस्ट्रीजच्या वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांची वसाहत व कामगारांसोबतच देवळीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस स्टिल प्लान्ट परिसरात राहत असलेल्या भागातील नागरिकांमध्ये दमा, निमोनिया, सर्दी तसेच फुफ्फुसाच्या आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. सुरू असलेल्या या प्रदूषणाला नियंत्रण मंडळाची मूकसंमती असल्याचा आरोप होत आहे. प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असताना या भागातील लोकप्रतिनिधींची चुप्पी चिंतेचा विषय ठरत आहे.स्थानिक आद्योगिक वसाहतीमध्ये देशातील पहिल्या क्रमांकाचा पॉवरग्रीड प्रकल्प कार्यरत आहे. वर्धा मार्गावर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या वसाहतीच्या १०० फूट अंतरावर महालक्ष्मी स्टिलचा डीआरआय (डायरेक्ट रिड्यूसिंग आयरन) हा नवीन प्रकल्प उभा ठाकला आहे. महालक्ष्मी स्टीलचे या वसाहतीत दोन प्रकल्प कार्यरत आहे. या दोनही प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुरांडे नसल्यामुळे निघणारा धूर हवेच्या दिशेने चारही बाजूला पसरत आहे. त्यामुळे दिवसासुद्धा या भागात काळोखाची स्थिती राहते. वसाहतीमध्ये राहत असलेल्यांना घराचे संपूर्ण दरवाजे व खिडक्या बंद करून स्वत:ला कोंडून घ्यावे लागत आहे. मुले खेळताना त्यांनाही याचा त्रास जाणवतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी वसाहतीतील नागरिकांद्वारे होत आहे
स्टिल प्लान्टमधील वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST