आर्वी : शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शालेय मुलांना ऐकविण्याची सक्ती करण्याचा आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झाला़ यामुळे भारनियमनमुक्त राहण्यासाठी जनरेटर, इनर्व्हटरची व्यवस्था प्रत्येक शाळांनी करावी, अशा आदेशाचे पत्रही शिक्षण विभागाला गुरूवारी प्राप्त झाले़ हे आदेश धडकताच मुख्याध्यापकांची मात्र धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे़या आदेशाचा काटेकोर अंमल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त चोकलिंगम यांनी दिलेत़ यामुळे तालुक्यातील २१६ शाळांत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुख्याध्यापक चांगलीच धावपळ करीत आहे़ विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधांसह शिक्षण विभागात आमुलाग्र बदल व उज्वल पिढी घडविण्यासाठी शिक्षक दिनी उद्बोधन केले जात आहे. इयत्ता १ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी शाळेतच ते ऐकावे लागणार आहे. पंतप्रधानाचे भाषण इंटरनेट, टीव्ही, रेडिओद्वारे प्रसारित होत आहे. ते विद्यार्थ्यांना ऐकविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे़ दुपारी शालेय वेळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, अशा सूचनाही दिल्यात़ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्याध्यापकांना दक्षता घेण्याच्या सूचना आहे़ शिक्षण सहसंचालक डॉ. सुनील मगर यांच्या स्वाक्षरीचे पत्रही बुधवारी प्राप्त झाल्याचे गटशिक्षण अधिकारी देशमुख यांनी सांगितले़तालुक्यात जि.प. च्या १४४, ऩप़ च्या १०, आश्रमशाळा ५, अपंग शाळा ४, खासगी माध्यमिक ३३, खासगी प्राथमिक १८, कनिष्ठ महाविद्यालय २ अशा २१६ शाळेतील विद्यार्थ्यांना भाषण ऐकविले जाणार आहे़ यातील २३ शाळांत संगणक प्रयोगशाळा असल्याने तेथे शक्य असून अन्य शाळांत प्रथम साहित्यच द्यावे लागणार आहे़(तालुका प्रतिनिधी)
भाषण ऐकविण्यासाठी मुख्याध्यापकांची धावपळ
By admin | Updated: September 4, 2014 23:59 IST