हिंगणघाट : येथील रेल्वेस्थानकावरील मालधक्का प्लॅटफॉर्मच्या आणि नागरी वस्ती लागूनच आहे. त्यामुळे मालगाडीतून वाहतूक होत असलेल्या डीओसी, युरिया आणि खाद्याची दुर्गंधी स्थानकावर नेहमीच असते. त्यामुळे हा मालधक्का येथून ५ किमी अंतरावर असलेल्या वाघोली रेल्वेस्थानकावर स्थानांतरित करण्याची मागणी मंडळ रेल्वे प्रबंधक, मध्य रेल्वे नागपूर यांना हिंगणघाट रेल्वे यात्री समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनानुसार हिंगणघाट रेल्वेस्थानकावर प्रवासी प्लॅटफॉर्म जवळच मालधक्का आहे. या मालधक्क्यामुळे प्रवासी आणि परिसरातील नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहे. आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे. हा मालधक्का तिकीट विक्री केंद्राजवळच आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्मसाठी पुलाच्या वर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या मालधक्क्याला पार करूनच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाता येते. मालधक्क्यावर माल चढविताना किंवा उतरविताना शंभरावर ट्रक मालधक्क्यावर उभे असतात. त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. या कारणाने तिकीट घ्यायला जाताना प्रवाशांना नेहमीच अपघाताचा धोका असतो. या मालधक्क्यावर जास्तीत जास्त रासायनिक खते आणि सोयाबिन डीओसीच्या रॅक असतात. माल उतरविताना व चढविताना यातील बराच माल जमिनीवर पडतो. यातुन दुर्गंधी उत्पन्न होवून त्याचा त्रास प्रवाशांना आणि परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका उत्पन्न झाला आहे.सध्या पावसाळा सुरू आहे. हा पडलेला माल सडत असल्यामुळे जास्त प्रमाणात दुर्गंधी उत्पन्न होऊन त्याचा त्रास प्रवाशांना सोसाव लागत आहे. हिंगणघाट येथील मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालय आणि व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नेहमीच गर्दी असते. अडचणीच्या जागी असलेल्या या मालधक्क्यामुळे अपघात संभवतात. येथून ५ किमी अंतरावर वाघोली रेल्वेस्टेशन आहे. तसेच या परिसरात नागरीवस्ती आणि विद्यार्थ्यांच्या शाळाही नाही. वाघोली रेल्वेस्टेशनवर रेल्वेट्रॅक लावण्यासाठी भरपूर जागाही आहे. त्यामुळे स्टेशन प्रबंधकांनी या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच परिसराची पाहणी करून हिंगणघाट येथील मालधक्का वाघोली रेल्वे स्थानकावर हलवावा अशी मागणी रेल्वे येथील समितीच्यावतीने करण्यात आली. शिष्टमंडळात प्रा. दिवाकर गमे, मनोज रूपरेल, सुनील डोंगरे, निलेश ठोंबरे, अशोक पराते, प्रलय तेलंग, प्रदीप जोशी, रेडगलवार, मुन्ना पुरोहित, लक्ष्मीकांत भगत, प्रकाश जोशी आदी सहभागी होते.(तालुका प्रतिनिधी)
हिंगणघाटचा मालधक्का वाघोलीला हलवा
By admin | Updated: August 10, 2014 23:11 IST