विविध आजारांवर सांगितले उपाय : देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात केली पाहणीवर्धा : कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तसेच केमच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवळी तालुक्यातील दिघी, बोपापूर, कोळोणा (चोरे) अडेगाव, या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जात त्यांना खरीप हंगामातील पिकांवरील समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक तसेच डॉ. प्रदीप दवने, विषयतज्ज्ञ पीक सरंक्षण व केमचे सचिन वडतकर यांनी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी दशरथ भुजाडे, गजानन भुजाडे, सचिन लांबट, विपीन थोटे, पांडूरंग वडतकर, उमेश फुलझेले, सुधीर धांदे, शैलेश काटेखाये यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. या शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकातील समस्या म्हणजे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात आढळून आला आहे. सोयाबीन पीक पिवळे पडून त्यावर काळसर लाल रंगाचे डाग आढळून आले. त्यावर उपाय म्हणून डॉ. नेमाडे तसेच डॉ. दवने यांनी ट्रायझोफॉस ४० ई.सी. १३ मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचे सुचविले. सोयाबीन पिकावर कॉपर आॅक्सिक्लोराईड ३० ग्रॅम तसेच स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम व १०० ग्रॅम युरियाची फवारणीचा सल्ला दिला. सोयाबीनवरव कमी प्रमाणात तंबाखूची पाने खाणारी अळी व हिरवी उंटअळी आढळून आल्यास झाडावर क्विनॉलफॉस १५ मि.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस १५ मिली या किटकनाशकाची फवारणी ८ ते १० दिवसांचे अंतराने करावी असे सांण्यात आले. तुरीवर सध्या सध्यास्थितीत पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आाहे. प्रामुख्याने सर्व बिटी वाणांवर वर्धा जिल्ह्यात सर्वत्र आढळून येत असल्याकारणाने कपाशीवर फिप्रोनिल ५ एस. सी. ४० मिली सोबत कॉपर आॅक्सिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम अधिक १०० ग्रॅम युरीया मिसळून फवारणी करावी. कपाशीची पाने मान टाकून कोमेजल्या अवस्थेत दिसून आल्यास कॉपर आॅक्सिक्लोराईड २५ ते ३० गॅम्र १० लीटर पाण्यात मिसळून झाडाला ड्रेचिंग करून झाडाला मुख्य खोडाला सर्व बाजूने पायाने दाब द्यावा जेणेकरून झाडाच्या जवळील गॅस बाहेर पडून झाडे सुस्थितीत येतील असा सल्ला डॉ. दवने यांनी दिला. मिरचीवरील चुरडा मुरडा या रोगाचा प्रसार दिसून येत असल्यास गोमुत्र १० लीटर पाण्यात १ लिटर तसेच मॅलॅथियॉन ५० ई.सी. २० मिली सोबत कॉपर आॅक्सिक्लोराईड किंवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम अधिक निंबोळी अर्क ५ टक्के १ लीटर १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसाच्या अंतराने फवारणी केल्यास रोगावर आळा बसेल.(प्रतिनिधी)
कृषी विज्ञान केंद्राच्या पाहणीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By admin | Updated: August 29, 2015 02:20 IST