शेतकरी वर्गाची अपेक्षा : बळीराजावर दुबार नव्हे तर तिबार पेरणीचे संकटदारोडा : मागील वर्षी पावसाचे थैमान तर यावर्षी पावसाची दडी अशा परस्पराविरूद्ध परिस्थितीत बळीराजा सापडला आहे. जून महिना संपून जुलै महिना अर्धा झाल्यावर पावसाने आता हजेरी लावली. शेतकऱ्यावर दुबार नव्हे तर तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी शासनाकडे करीत आहे. मध्यंतरी एक दिवस पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. बळीराजाने पेरणीला सुरूवात केली. पण कपाशीचे अंकुर वर येताच पावसाने दडी मारली. आजतागायत ती दडी कायम होती. त्यामुळे कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार नव्हे तर तिबार पेरणीचे संकट आलेच पण सिंचनाची सोय असलेल्यांचेही भरानियमनाने कंबरडे मोडले. त्यांच्यावरही दुबार पेरणीची पाळी आली. कपाशी, सोयाबीन, तूर अंकुर येवून आपल्या मातेच्या कुशीतच त्यांना गुदमरून गेले.आधीच बळीराजाने पेरणीसाठी घरचे पशू धन, सोने विकून बी-बियाणे खरेदी केले. पण ते सर्व वाया गेले. आता दुसरे आणायचे कसे या विवंचनेत बळीराजाची झोप उडाली. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. यातच भर म्हणून भारनियमनाने त्रस्त केले आहे. याचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याच्यावर दुबार पेरणीचे वेळ आली आहे. परंतु या पेरणीसाठी बळीराजाजवळ दमडीही शिल्लक नाही. तेव्हा शासनाने ही परिस्थिती समजून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सर्वत्र बळीराजाने केली आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रामध्ये तिनही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुले पुन्हा एकदा विदर्भातील बळीराजा हवालदिल झाला असून तो अस्मानी संकटात सापडलेला आहेत.राज्यामध्ये सर्वत्र हिच परिस्थिती दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा, वडनेर, फुकटा, आजनसरा अशा २० गावातील शेतकऱ्यांच्या पेरण्या शंभर टक्के झाल्या असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यातच मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा असा प्रश्न दत्त म्हणून उभा आहे. त्यामुळे शासनाने सरसकट बळीराजाला मदत देण्याची मागणी अनेक संघटना व शेतकरी करीत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज भासत आहे.(वार्ताहर)
पेरणीसाठी शासनाने मदत करावी
By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST