सेलू : सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना शासकीय कार्यालय परिसरात मात्र स्वच्छतेचा अभावच दिसतो़ यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनाच तर अभियानाचा विसर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ तालुक्यात अनेक शासकीय कार्यालये असून २ आॅक्टोबरला सर्व कार्यालयांत स्वच्छता करण्यात आली. तेव्हापासून बहुतांश कार्यालयाला झाडूच लागला नसल्याचे वास्वत आहे़ काही कार्यालयातील कक्षांना भिंतीवर जाळे साचले असून परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्याचे दिसून येते़ पं़स़ कार्यलयाच्या मागील बाजूची स्वच्छता कित्येक दिवसांपासून करण्यात आलेली नाही़ पाटबंधारे विभागाच्या इमारतीच्या मागे अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बहुतांश गावांतील ग्रा़पं़ कार्यालय परिसरात, पशुवैद्यकीय दवाखाने यांना झुडपांचा वेढा दिसून येतो़ बहुतांश गावांतील नाल्या गाळाने बुजल्या असून त्याची साफसफाई नियमत होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात आहे़ शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात केली. नंतर स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियान सुरू झाले़ यात कार्यालये स्वच्छ झाली; पण कालांतराने याकडे दुर्लक्ष होते़ यामुळे जुनीच स्थिती कायम राहत असल्याचे दिसते़ या प्रकारांमुळे अभियानाची धार बोथट तर होत नाही ना, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.(शहर प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयांत स्वच्छतेचा अभाव
By admin | Updated: April 9, 2015 02:55 IST