फसवणुकीचा गुन्हा दाखल : वर्धेतील एका हॉटेलातून घेतले ताब्यात वर्धा : एमएसईबीचा साहेब असल्याची बतावणी करणाऱ्या गोंदिया येथील एका ठगबाजाला शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्याने देवळी येथील पॉवर ग्रीडमध्ये खानावळ सुरू करण्याकरिता रक्कम मागितल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. बच्चूमल भगामल लालवाणी रा. कुंभारटोली, गोंदिया असे या अटकेत असलेल्या या ठगबाजाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सुत्रानुसार, शहर ठाण्यात गुरुवारी रात्री शंकर भावनदास चैनाणी रा. दयालनगर याला देवळी पॉवर ग्रीड येथे खानावळ सुरू करण्याची परवानगी देतो, असे म्हणून बच्चूमल लालवाणी याने १४ हजार २०० रुपयांची मागणी केली. एमएसईबीत मोठा अधिकारी आहे, आपल्या एका स्वाक्षरीने कोणतेही काम होते, असे सांगितल्याने चैनाणी याला बच्चूमल याच्यावर विश्वास बसला. यामुळे त्याने सदर रक्कम त्याच्या हवाली केली. रक्कम देण्यास बराच कालावधी झाला तरी त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे चैनाणी याने महावितरणच्या कार्यालयात जात चौकशी केली असता या नावाचा कुठलाही अधिकारी नसल्याचे समोर आले. यामुळे त्याने गुरुवारी रात्री शहर ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्याच्या या तक्रारीवरून मिळालेल्या माहितीनुसार त्याला शहर पोलिसांनी रात्री येथील रेल्वे स्थानकानजिक असलेल्या एका हॉटेलातून अटक केली. (प्रतिनिधी)
एमएसईबीच्या नावावर गंडा घालणारा गोंदियाचा ठगबाज गजाआड
By admin | Updated: August 1, 2015 02:29 IST