वर्धा : देवळी तालुक्यातील खरी लढत उमेदवारांत नव्हतीच तर ती दोन पहेलवानांमध्ये होती. काँगे्रसला बालेकिल्ला राखायचा होता तर भाजपाला तो गड पूर्णत: काबीज करायचा होता. यामुळे प्रत्येक लढत आमदार विरूद्ध खासदार, अशीच झाली; पण यात काँग्रेसचा गडही गेला आणि सिंहही गेला, अशी स्थिती झाले. परिणामी, काँगे्रसवर अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची वेळच आल्याचे दिसते. देवळी तालुक्यात नाचणगाव, गुंजखेडा, इंझाळा, भिडी, गौळ व अंदोरी, हे सहा गट आहे. यातील भिडी येथील लढत आमदार व खासदाराची प्रत्यक्ष भिडंत तर अन्य गटांत प्रतिष्ठा पणाला होती. काही वर्षांपूर्वी केवळ काँगे्रसचे प्राबल्य असलेले देवळीतील गट हळूहळू भाजपच्या ताब्यात गेले. हा बालेकिल्ला राखण्यासाठी आ. कांबळे यांच्यासह काँग्रेसींनी आटापिटा केला; पण एकही गट राखता आला नाही. सहापैकी भिडी, गौळ, इंझाळा, गुंजखेडा व नाचणगाव या पाच गटांवर भाजपाने झेंडा फडकाविला तर अंदोरी गट राष्ट्रवादी काँगे्रसने राखला. एकेकाळी बालेकिल्ला असलेला देवळी तालुका काँगे्रसला यंदाच्या निवडणुकीत गमवावा लागला. प्रतिष्ठेच्या लढाईत आमदाराचे खासदाराने पानीपत केले. हा पराभव काँग्रेसला जिव्हारी लागणारा असून चिंतन करायला भाग पाडणारा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
गडही गेला आणि सिंहही गेला...
By admin | Updated: February 24, 2017 02:09 IST