हिंगणघाट : येथील बांधकाम कंट्राटदार राजेंद्र अवचट यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक राजेंद्र अवचट यांनी ऊर्जा टेक कंपनीचा गुफीलींगचा लेबर कंत्राट घेतला होता. त्या कामाचे देयक सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देण्यास नकार दिल्याने त्यांनी मंगळवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या खिशातून पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत ऊर्जा टेक कंपनीच्या आशुतोष शर्मा, जगताप, गोविंद, प्रमोद यांनी फसवणूक करून बिलाची रक्कम हडप केल्याने आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे. सदर चिठ्ठीतील मजकुर व मृतकाचा मुलगा प्रणय अवचट यांच्या तक्रारीवरुन उमेश पगारिया यांच्यासह आशुतोष शर्मा, जगताप, गोविंद, प्रमोद यांच्याविरूद्ध भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र कुणालाही अटक झालेली नाही. या संदर्भात मृतकाच्या परिवाराकडून कंत्राटासंबंधी कागदपत्रे घेवून त्या आधारे चौकशी करून कारवाई करणार असल्याचे ठाणेदार एम. बोडखे म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 8, 2015 01:48 IST