वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहार गत एक वर्षापासून पूर्णत: ठप्प आहे़ यामुळे ठेवीदारांसह कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गत १० महिन्यांपासून बँकेतील एकाही कर्मचाऱ्याला वेतन मिळालेले नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती या आर्थिक संकटाने बिघडली असून काहींना पर्यायी रोजगार शोधावा लागत असल्याचे चित्र आहे़जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचे व्यवहार गत एक वर्षापासून ठप्प आहे़ कोणतेही व्यवहार नसल्याने कृषीकर्जापोटी वितरित केलेले कर्जही परत येत नाही़ यामुळे दैनंदिन व्यवहारांना खीळ बसली आहे़ कर्जाच्या रूपात इतरांना वितरित केलेले पैसे परत मिळाले नाही. अशातच बँकेतून होणारे शिक्षकांचे वेतन, ओडीचे व्यवहारही अन्य बँकांत स्थलांतरित झाले. याच बँकेत पूर्वी वीज वितरण कंपनीची देयके स्वीकारली जात होती. तेही व्यवहार बंद करण्यात आले. परिणामी, बँकेत सध्या पैसे भरण्याकरिता कुणीही येत नाही. केवळ पैसे परत मागणारेच येताना आढळतात. संपूर्ण आर्थिक व्यवहार बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. १० महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने त्यांच्या घरची स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. काहींची मुले दहावी व बारावीत शिक्षण घेत आहे़ त्यांना शिकवणी लावणे आवश्यक असताना आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने ती लावता येत नाही. शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून देता येत नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त केली. काही कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा तर काहींना शुगर, किडणीसह अन्य आजार जडले आहेत. ते कर्मचारी पूर्वी शहरातील नामवंत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचार घेत होते; पण पैशाअभावी अनेकांनी सावंगी वा सेवाग्राम रुग्णालयाची वाट धरली. यातही औषध लिहून दिल्यावर ते घेण्याची सोय खिशात नसल्याचे सांगण्यात येते. काही कर्मचाऱ्यांच्या गृहिणींना गंभीर आजार आहेत. त्यांच्यावर उपचार करता येत नसल्याची खंत व्यक्त करतात़ काही कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज तर काहींनी मुलांच्या शिक्षणाकरिता कर्जाची उचल केली. त्या कर्जाचे हप्तेही भरता येत नाही. बँकेचे व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. ते लवकर सुरु करण्याची गरज आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हा बँक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट
By admin | Updated: May 9, 2015 02:02 IST