समुद्रपुर : आरंभा ते निंभा या मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. यातच भर म्हणून पावसामुळे हा रस्ता खचला असून अद्याप त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे या मार्गे धावणारी बस परिवहन मंडळाने १५ दिवसांपासून बंद केली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. बसफेरी बंद केल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याविषयी प्रहार संघटनेने संबंधित बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी करण्यात आली. बसफेरी बंद केल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसामुळे रस्ता खचल्याने बस महामार्गावरील आरंभा पाटीपासूनच परत जाते. यामुळे कवठा, किन्ही, झुणका, रुणका, निंभा, लोणार या गावांतील प्रवासी आणि विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. या परिसरातून महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चालत जावे लागते. यापैकी काही गावांचे अंतर आरंभा पाटीपासून सुमारे १० किलोमीटर आहे. बस येत नसल्याने नागरिकांना दुचाकी, बैलगाडीने जावे लागते. खासगी वाहन या गावात येत नसल्याने येथील नागरिकांचे गैरसोय होत आहे. यापूर्वी नागरिकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे याबाबत निवेदन दिले होते. मात्र अद्याप नागरिकांना समस्येतून दिलासा मिळाला नाही. या समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता प्रहार युवा शेतकरी संघटनेच्यावतीने रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून बांधकाम विभागाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यात आला. या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, यांना देण्यात आली आहे. नागरिकांचे कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. यावेळी संघटनेचे तालुका प्रमुख देवा धोटे, प्रवीण जायजे, गोलू आंबटकर, सचिन फोडकर, अश्विन ढोके, अमित कुमरे, जीवन माथनकर, आकाश राऊत, प्रशांत धोबे, गजू नक्षिणे, दिनेश मुसके आदी कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)
आरंभा मार्गावर जीवघेणा खड्डा
By admin | Updated: August 12, 2014 23:55 IST