आर्वी : उशिरा आलेल्या पावसामुळे लावणही उशिराच झाली. त्यातच जुलै महिन्यात तीनच दिवस कहर केल्याने दुबार-तिबार संकटानंतर तालुक्यातील बाकळी, वर्धा, आडनदी काठावरील शेतपिके अतिवृष्टीने खरडून गेली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पण २३ जुलैपासून आर्वी तालुक्यात पावसाने उघाड दिल्याने उरले-सुरले पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. पुन्हा शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.आर्वी तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीने ग्रासला असून आर्थिक संकटात सापडला आहे. गतवर्षीच्या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने ग्रासल्याने यावर्षी तरी शेती हंगाम चांगला राहील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु पंधरवड्यापासून पाऊस गायब झाल्याने व सध्या शेतपिकांना वाढीसाठी पावसाची नितांत गरज असल्याने आकाशाकडे नजरा लागल्या आहे.आर्वी तालुक्यात सोयाबीन व कपाशी पिकावर अतिवृष्टीने थैमान घातल्याने उरले सुरले पीक हाती यावे यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा नाही. त्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. १५ दिवसांपासून तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. आधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांना ग्रासले. आता पावसाच्या उघाडीने शेतकरी त्रस्त असून दुहेरी संकटात शेतकरी सध्या सापडला आहे.(तालुका प्रतिनिधी)
पावसाच्या उघाडीने शेतकरी चिंताग्रस्त
By admin | Updated: August 14, 2014 00:02 IST