हिंगणी येथील प्रकार : तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेचे जागेच्या वादाकडे दुर्लक्षबोरधरण : हिंगणी जि.प. शाळेच्या जागेचा वाद न्यायालयात होता. या प्रकरणाचा निकाल जमीन मालकाच्या बाजूने लागला. सदर मालकाने २४ जुलै २०१४ रोजी इमारतीच्या प्रवेश भागात काटेरी तारेचे कुंपण केले. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची अडचण झाली. गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनावर गैरसोय होऊ नये म्हणून कुंपण काढले; पण जि.प. शाळेसाठी ही जागा किरायाने घेण्याबाबत निर्णय झाला नाही. दोन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर शेतकऱ्याने यंदा नांगरणी करून शेती करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण विभाग अडचणीत आला. हिंगणी येथील दिवंगत नारायण शिवराम साटोणे या शेतकऱ्याने तत्कालीन जनपदाला १९५४-५५ मध्ये हिंगणी येथे शाळा बांधकामासाठी एक एकर जागा दान दिली होती. १९५६ मध्ये तेथे शाळेची इमारत बांधली गेली. तेव्हापासून शाळा सुरळीत सुरू होती; पण २००३ मध्ये नारायण साटोणे याचा नातू भोला साटोणे याने आजोबाने दान दिलेल्या जागेच्या मोबदल्यात पत्नीला अंगणवाडी सेविकेची नोकरी देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाली नाही. यामुळे संतप्त भोला याने जि.प. कडे दानपत्राच्या कागदपत्रांची मागणी केली; पण जि.प. कडे दानपत्राचे कोणतेही दस्तावेज उपलब्ध नव्हते. याच आधारावर त्याने २००४ मध्ये न्यायालयात धाव घेत तथाकथित दान असलेली जमीन माझीच असल्याचा दावा पुराव्यासह केला. यात सेलू येथील दिवाणी न्यायालयाने १५ जानेवारी २०११ रोजी भोला साटोणे याच्या बाजूने निर्णय दिला. यावरून तो जि.प. प्रशासनाकडे जागा खाली करणे व भाडे देण्याबाबत पत्रव्यवहार करीत होता; पण जि.प. प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर २४ जुलै १४ रोजी त्याने शाळेत प्रवेश मार्गावर काटेरी तारेचे कुंपण करून मार्ग बंद केला. ही बाब मुख्याध्यापक राजू गुजरकर यांनी गटशिक्षणाधिकारी संजय वानखेडे, विस्तार अधिकारी चेतना भुते, सुशील बंसोड, केंद्रप्रमुख गजानन बुराडे यांना सांगितली. तोपर्यंत विद्यार्थी बाहेरच उभे होते. पाऊस सुरू झाल्याने यशवंत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गिरडे यांनी त्यांच्या शाळेत बसण्याची व्यवस्था करून दिली होती. दुपारी गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांनी हिंगणी गाठून भोलाशी चर्चा केली. मागण्या जि.प. शिक्षण विभागाकडे पोहोचवू, अशी ग्वाही दिल्यानंतर साटोणे यांनी कुंपण काढले. ६० वर्षांत दान जमिनीचा सातबारा शिक्षण विभागाने आपल्या नावे का केला नाही, हे कोडच आहे. तीन वर्षे लोटूनही जागेचा निर्णय न घेतल्याने भोलाने नांगरणी करून शेती करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत शाळा सुरू होणार असून जागा नांगरल्याने विद्यार्थी, शिक्षकांची गोची होणार आहे.(वार्ताहर)पालक, विद्यार्थी चिंतेतजागेच्या वादामुळे पालक व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. मुलांना पावसात उभे तर राहावे लागेल की यशवंत शाळेच्या वऱ्हांड्यात बसावे लागेल, असा प्रश्न पालक व विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.न्यायालयातही साटोणे विजयीजि.प. प्रशासन पत्नीला नोकरी देत नसल्याने संतप्त भोला साटोणे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यात तो विजयी झाल्याने जि.प. प्रशासनाने जमिनीचे भाडे देणे गरजेचे होते; पण त्यावर २०११ पासून कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.भोला साटोणे यांनी शाळेच्या समोरची जागा नांगरण करून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गोची होणार आहे. तीन वर्षांपासून जि.प. प्रशासनाने निर्णय न घेतल्याने आता वेळेवर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्यासोबत यावर चर्चा करण्यात आली; पण यातून काही निष्कर्ष निघाला नाही. सदर जागा माझ्या मालकीची असल्यामुळे नांगरण, मशागत करून यावर्षीपासून मी तिथे शेती करण्यास सुरूवात करणार आहे.- भोला साटोणे,जागेचे मालक, हिंगणी
शेतकऱ्याने नांगरले शाळेचे प्रांगण
By admin | Updated: June 25, 2015 02:18 IST