नाचणगाव : कोरडवाहू असलेल्या विदर्भात सिंचन वाढावे याकरिता मोठ्या प्रमाण धरणे तयार करण्यात आली. या धरणातील पाणी शेतात पोहोचविण्याकरिता वितरिका तयार केल्या. या वितरीकेचे पाणी शेतात पोहोचविण्याकरिता कालवे तयार करण्यात आले. तसेच कालवे नाचणगाव येथे तयार करण्यात आले; मात्र त्याचे बांधकाम झाले नसल्याने हे कालवे या भागातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरण्याऐवजी शाप ठरत आहेत. निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या मोठ्या कालव्यावरुन शेतांना पाणी पुरविण्यासाठी लहान कालवे तयार करण्यात आले. या कालव्यातील पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविण्याकरिता नजीकच्या कोळोणा वितरीकेवरून छोटे कालवे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयानुसार कामाला प्रारंभही झाला. जेसीबीने खोदकामही करण्यात आले. याला दोन वर्षांचा कालावधी होत आहे. कालव्याच्या कामाकरिता परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेण्यात आल्या. त्यांच्या शेतातून कालवे खोदण्यात आले. खादाकामानंतर बांधकाम सुरू केले होते. परंतु सुरू झालेले बांधकाम काही कालावधीत थांबले. त्यामुळे या कालव्यांना मोठमोठ्या नाल्यांचे स्वरुप आले आहे. शासनाने शेतातील काही भाग घेतला; मात्र अर्धवट कालव्यामुळे पाणी साचल्यामुळे वाहितीतील शेतजमीन सुद्धा खराब होवू लागली आहे. काही ठिकाणी तर खोदलेले नाले फुटल्यामुळे शेतजमीन जलमय झाल्याचे दिसते. या साचलेल्या पाण्यामुळे पाझर निर्माण होऊन इतर पिकांचे क्षेत्र सुद्धा धोक्यात आले आहे. बांधकाम सुरू झाले त्यावेळी सदर बांधकाम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटूनही सदर काम पूर्ण झाले नाही.खोदलेले खड्डे आणखी किती नुकसान करणार याबाबत शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सदर कामाची पाहणी संबंधीत विभागाने करून लवकर त्याची सुधारणा करावी, अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे.(वार्ताहर)
खोदलेल्या कालव्यांमुळे शेतीची दैना
By admin | Updated: August 5, 2014 23:49 IST