वर्धा : जिल्हा परिषद सभागृहात अतिसार नियंत्रण पंधरवडा निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या अंतर्गत आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, प्रमुख अतिथी मेसरे, डॉ. जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हार्ण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सानोने, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजय डवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत धामट, डॉ. दिदावत तालुका आरोग्य अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना चौधरी यांनी बालमृत्यू कमी करण्याकरिता शासनस्तरावर २८ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा करण्यात येतो. यात शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकूण मृत्यूपैकी अकरा टक्के बालमृत्यू केवळ डायरीयामुळे होते. हे मृत्यू प्रामुख्याने पावसाळ्यात व उन्हाळ्यात होतात हे मृत्यू टाळण्याकरिता बाळाच्या मातेस अतिसारबाबत व उपचाराबाबत माहिती असणे आवश्यक आहे. याकरिता अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९७७ आशा स्वयंसेविका मार्फत सर्व कुटुंबाचे सर्व्हेक्षण घेणार असून ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकाची तपासणी, त्यांच्या मातांना अतिसार बाबत माहिती अतिसार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व अतिसार झाल्यास करावयाच्या उपाययोजना इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी व प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व उपकेंद्र स्तरावर उद्घाटन सोहळा घेवून वातावरण निर्मिती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे चौधरी यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना केले.या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व आशासेविका यांना वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणात जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी केले. यावेळी डॉ. देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी म्हणून वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
अतिसार नियंत्रणावर जिल्हास्तरीय कार्यशाळा
By admin | Updated: July 23, 2014 23:46 IST