श्रेया केने, पराग मगर = वर्धाविज्ञानाचा उपयोग केवळ मानवी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नाही तर जगाचे व मानवजातीचे कल्याण साध्य व्हावे याकरिता करण्याच्या दृष्टीकोनातून युनेस्कोने शांतता आणि विकासासाठी विज्ञान दिनाची सुरूवात केली. विज्ञान ही केवळ समजून घेण्याची बाब नाही तर ती प्रत्यक्षात सिद्ध करण्याची आहे. विज्ञानात प्रात्यक्षिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हा विचार समोर ठेवूनच जिल्ह्यातील बजाज सायन्स सेंटर काम करीत आहे. या माध्यमातून बालकांवर विज्ञानविषयक संस्कार करुन त्यांच्यातील जिज्ञासेला प्रोत्साहन देत देशाकरिता भावी वैज्ञानिक घडविण्याची ही प्रयोगशाळा ठरत आहे.शिक्षणाचा पाया हा बालपणातच पक्का व्हावा, असे शिक्षणतज्ज्ञ म्हणतात. मुलांमधील चौकस बुद्धीला नवा आयाम देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. विज्ञानाचे प्रयोग केवळ शिकायचे नसतात तर ते प्रत्यक्षात करून बघायचे असतात यावर येथे भर दिला जातो. आज जिल्ह्यातील विद्यार्थी वैज्ञानिक परीक्षांमध्ये सहभागी होत नावलौकीक मिळवत आहे. महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे हे केंद्र बालवैज्ञानिक बनविण्याची प्रयोगशाळा म्हणूनच नावारुपास येत असून जिल्हाही बालवैज्ञानिक बनविण्यात अग्रेसर ठरत आहे. विज्ञान विषयात प्रात्यक्षिकाचे महत्त्व पाहता शाळेत विज्ञानाचे प्रात्यक्षिक करून घेतले जात असले तरी अनेकदा शाळेत पुरेसे साहित्य उपलब्ध नसते. शहरातील मोजक्या शाळा सोडल्या तर जिल्ह्यातील बहुतेक शाळांची स्थिती विज्ञान प्रयोगाबाबत तितकीशी पुरक नाही. विज्ञान स्पर्धांच्या काळात मुलांकडून प्रयोग करुन घेतले जातात. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेणे शक्य नसते. मुलांनी कितपत ज्ञान अवगत केले जाणून घेणे अशावेळी शक्य होत नाही. हीच बाब हेरून जिल्ह्यातील गांधी ज्ञान मंदिर ट्रस्टच्यावतीने बजाज सायन्स सेंटरची रुजवात २००७ पासून करण्यात आली. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. परीक्षा घेऊन अत्यल्प प्रवेशशुल्क आकारून परीक्षा पद्धत सुरू करण्यात आली. प्रशस्त वास्तू आणि गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालवैज्ञानिक बनविण्यात जिल्हा अग्रेसर ठरत असल्याचे गत काही वर्षावरून दिसून येत आहे.
बालवैज्ञानिक घडविण्यात जिल्हा अग्रेसर
By admin | Updated: November 9, 2014 23:17 IST