विरूळ (आ़) : शासनाच्यावतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाते; पण यात प्रचंड घोळ होत असल्याचे समोर आले आहे़ रोहणा शिवारात मागील वर्षी आलेल्या महापुराने शेतजमिनी पूर्णत: खरडून निघाल्या़ परिणामी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले़ त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला; पण यात काहींना मदत मिळाली तर काहींना वंचित राहावे लागले़ यात ज्यांच्या नावावर जमीनच नाही, अशा शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे़ शासनाने गाजावाजा करीत शेतकऱ्यांना मदत केल्याचे जाहीर केले़ मागील वर्षी जुलै महिन्यात रोहणा परिसरातील भोलेश्वरी नदीला आलेल्या महापुरात नदीच्या काठावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत शासनाने पाठविलेल्या मदतीत घोळ करण्यात आला़ शेती नसणाऱ्यांची नावेही मदतीच्या यादीत टाकण्यात आली़ यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी यात घोळ केल्याचे लक्षात येते. याप्रकरणी वंचित शेतकऱ्यांनी तक्रारी करून सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ पुराच्या पाण्याने ज्या शेतीचे नुकसान झाले, त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या महापुरात घरांची पडझड, भांडीकुंडी, लग्नप्रसंगाचे साहित्य, कपडा, धान्य महत्त्वाची कागदपत्रे वाहून गेली़ यामुळे प्रचंड नुकसान झाले़ नुकसान पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले़ शासनातर्फे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी संयुक्त सर्वेक्षण करावे, असे आदेश देण्यात आले होते; पण यात घोळ करीत नुकसानग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार करण्यात आला़ सर्वेक्षण करताना एका महिलेच्या नावाने ३६ हजार रुपयांची अनुदानाची उचल करण्यात आली तर ज्यांच्या नावाने शेती नाही अशांना १ लाख ८ हजार एवढी नुकसान भरपाई देण्यात आले़ या प्रकरांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे़ याबाबत रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आर्वी यांना निवेदन सादर करून त्वरित चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची करावाई करावी, अशी मागणीही केली; पण यात अद्यापही चौकशी करण्यात आली नाही़ यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कारंजा तालुक्यात अतिवृष्टी व गारपिटग्रस्तांच्या मदतीत घोळ आणि आर्वी तालुक्यातही तोच प्रकार समोर आल्याने शेतकऱ्यांच्या मदतीवरही अधिकारी, कर्मचारी डोळा ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ परिसरातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही़ विरूळ येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभाग व स्थानिक स्टेट बँकेच्या भोंगळ कारभाराचा सामना करावा लागत आहे़ यामुळे शेतकरी संतप्त आहेत़ याबाबत कृषी सहायकांना विचाणा केल्यास, आम्ही मदतीची यादी पाठविली, असे सांगितले जाते; पण यादीत चुकीचे खातेक्रमांक देण्यात आल्याने मदतीचे वाटप करण्यात अडचणी येत असल्याचे बँक प्रशासनाद्वारे सांगितले जात आहे़ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)
अतिवृष्टीच्या मदत वाटपात घोळ
By admin | Updated: August 24, 2014 23:41 IST