वर्धा : राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर व सोयाबीन पिकांसाठी कृषी विमा उतरविला होता. मागील वर्षी खरीप हंगामात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे पिकांची आणेवारी पन्नास पैशाच्या आत व उंबरठा उत्पन्न साठ पैशाच्या आत आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता या तालुक्यात राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यात १२ हजार ९२३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र यापैकी अनेकांना मागील वर्षीच्या नुकसानीकरिता अद्याप अनुदान मिळाले नाही. योजनेच्या लाभापासून वंचीत शेतकरी शासनाकीय कार्यालयात जाऊन पाठपुरावा करीत होते. मात्र त्यापैकी केवळ १९१ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. उर्वरित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढले. शेतीमधून लाभ न मिळालने हे कर्ज आता कसे भरावे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. विम्याचा लाभ मिळेल या आशेने शेतकरी कार्यालयात जातात. मात्र पदरी निराशाच येते. अतिवृष्टीमुळे आधीच त्यांना नुकसान सोसावे लागले. त्यातही शासनाकडून मदत मिळत नाही. पीक विमा करुनही शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करावी अशी मागणी सौरभ तिमांडे यांच्यासह शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातून केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
पीक विमा योजना लागू करावी
By admin | Updated: July 18, 2014 00:17 IST