शेतकरी चिंतेत : खरिपाची पिके धोक्यातंरोहणा : यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहील, पण आॅगस्टमध्ये राज्यात सर्वत्र व चांगला पाऊस पडेल, असा अंदाज शासनाच्या हवामान खात्याने पूर्वी वर्तविला होता. पण अंदाज पूर्णत: चुकीचा ठरला असून पावसाअभावी खरिपाची पिके धोक्यात आली आहे.आजही हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आपल्या शेतात कोणते पीक घ्यावे, केव्हा कोणते खत वापरावे याचे नियोजन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. साधारणत: हवामान खात्याचा पावसासंदर्भातील अंदाज निदान ७५ टक्के तरी खरा ठरावा, अशी सामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा असते. परंतु यंदा हवामान खात्याचा पावसासंदर्भातील अंदाज मोठ्या प्रमाणात फोल ठरले आहे. हवामान खात्याने यंदा सुरूवातीला कमी पाऊस असला तरी संपूर्ण आॅगस्ट महिन्यात चांगला पासून येईल असा अंदाज वर्तविला होता. या अंदाजावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी १ आॅगस्टची नागपंचमी झाल्याबरोबर आपल्या शेतातील पिकांना रासायनिक खतांच्या मात्र दिल्या. पण अर्धा आॅगस्ट महिना संपत आला तरी वर्धा जिल्ह्यात आवश्यक तेवढा किमान पाऊसही आला नाही. परिणामी खताच्या मात्रेचा अनुकूल परिणाम होण्याऐवजी प्रतिकूल परिणाम होऊन पिके रोगग्रस्त होवून पिकांची वाढ खुंटली आहे. खतावरील खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाच्या हवामान खात्याने आपले अंदाज शास्त्रीय कसोट्यांच्या निकषांवर पडताळून पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. कधी तरी हवामान खात्याचे अंदाज बरोबर निघावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)
हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने फसगत
By admin | Updated: August 12, 2014 23:55 IST