वर्धा : खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व कपाशीने शेतकऱ्यांना पूरते हैराण केले़ निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीन गेले व हमीभाव कमी असल्याने कापूसही परवडेना झाला़ त्यातच शेतात कापूस आहे; पण मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईच्या काळात नवीनच संकटाला तोंड द्यावे लागत आहे़खरीप हंगामातील कापूस हे पीक महत्त्वाचे मानले जाते़ ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आजही हिरवीकंच कपाशीची झाडे आहेत़ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे डौलदार पीक दिसते़ शेतातील कपाशीच्या झाडांना कापूसही फुटला आहे; पण वेचाईची कामे करण्यासाठी मजूरच मिळेणा झाला आहे़ पुर्वी दसरा-दिवाळीच्या कालावधीत शेतात कापूस फुटत होता; पण यंदा वातावरण बदलाने दिवाळीनंतर कापसाची वेचाई सुरू झाली़ कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस एक-दोन वेच्यातच संपुष्टात आला; पण ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आजही कापूस फुटलेला दिसून येतो़ शेतकरी आर्थिक टंचाईत असतानाही मजुरांचा शोध घेत कापसाचा वेचा करण्याचा प्रयत्न करीत आहे़ यात वाढती मजुरी आणि मजुरांची टंचाई या संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे़ एका मागून एक येणारी संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्यसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
कापूस फुटला; पण मजुरांची वाणवा
By admin | Updated: January 18, 2015 23:16 IST