पिंपळखुटा : गत एक महिन्यापासून पाऊस नसल्याने कपाशीची आंतरमशागत होऊ शकली नाही. शिवाय सध्या कपाशीवर लाल्या सदृश्य रोगाने आक्रमण केल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ या प्रकारामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहेत़ नगदी पीक समजले जाणाऱ्या कपाशीचे नुकसान झाले तर रबी हंगामाचे काय आणि वर्षभराचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ वातावरणातील बदलामुळे कपाशी व तूर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ प्रारंभी सोयाबीनचे पीक चांगले दिसत होते; पण ऐन पीक फुलावर असताना पावसाने दगा दिला़ यामुळे शेंगांची भरण व्यवस्थित होऊ शकली नाही. सोयाबीनचा उतारा एकरी एक ते दोन पोते आहे़ सोयाबीनचा दाणा ज्वारीच्या दाण्यासारखा बारीक झाला आहे. यामुळे अशा सोयाबीनचा बाजारभाव कमी येत आहे. खर्चाच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या उत्पन्नात मोठे नुकसान झाले असून कपाशीचाही भाव मागील वर्षीपेक्षा कमी आहे. उत्पन्नाचे प्रभाणही कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. सध्या शेतात असणाऱ्या कपाशीच्या वेचनीकरिता येणारा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही़ सोयाबीन सवंगणीचा खर्चही एकरी १४०० रुपये असून मजूरही वेळेवर मिळत नाही. यामुळे शेतातील शेतमाल गोळा करणे हेही शेतकऱ्यांना कटकटीचे काम झाले आहे. दिवाळीपूर्वी कापूस शेतकऱ्यांच्या घरात असतो; पण यंदा विचित्र वातावरणामुळे कपाशीच्या झाडांना कापूस फुटलेला दिसत नाही़ सोयाबीनही नाही आणि कपाशीही नसल्याने शेतकरी हताश झाला आहे़विषम वातावरणामुळे सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न अत्यल्प आहे; पण सोयाबीनची प्रत अत्यंत निकृष्ट झाली आहे. यामुळे भाव फार कमी येणार असल्याने सोयाबीनच्या उत्पन्नावर असलेल्या शेतकऱ्यांचे बजेट पार कोलमडले आहे. पाऊस नसल्याने कपाशीच्या उत्पन्नाची आशा राहिली नाही. यामुळे शेतीकरिता घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, पूढील वर्ष कसे चालवावे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य, आजारपण आदी बाबी कशा पार पाडाव्यात, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे़ शासनाने दुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़(वार्ताहर)
कपाशीवर पुन्हा लाल्याचे आक्रमण
By admin | Updated: October 27, 2014 22:42 IST