कारंजा (घा़) : खरीप हंगामात तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य या पिकांचा समावेश होतो़ या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक घटकांपैकी पीक संरक्षण हा महत्त्वाचा घटक आहे़ यात पिकांचे विविध किडी व रोगांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे़ सध्या उन्ह-पावसाच्या खेळामुळे पिकांवर विविध रोगांचे आक्रमण होत आहे़ यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़विदर्भात प्रामुख्याने विविध पिकांवर तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी या रस शोषक किडी, लष्करी अळी, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी या अळ्या पाने खातात़ बोंड अळी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो़ पाने खाणाऱ्या अळयांपैकी लष्करी अळी सोयाबीन, कापूस, कडधान्य, भाजीपाला तसेच लिंबुवर्गीय फळझाडांवर आढळून येते़ ही अळी खादाड असून ती अधाशीपणे पीक खाते़ नंतर अळी मोठी पाने खाते व पानाच्या केवळ शिराच शिल्लक राहतात़ पाने खाणारी अळी ही वांगी, टोमॅटो, मका, वाटाणा, केळी या पिकांचे नुकसान करते़ पाने गुंडाळणारी अळी ही कापूस, भेंडी, भात आदी पिकांवर आढळते़ ती पानाची गुंडाळी करते़ सुरळी करून त्यात राहुन पाने खाते़ गुंडाळी केलेले पान नरसाळ्यासम दिसते़ कीड मोठ्या प्रमाणात असल्यास झाड पिवळसर पडून वाळते़ बोंड अळी कापूस, तूर, सूर्यफुल, मका व विविध भाजीपाला यावर आढळून येते़ लहान अळ्या प्रारंभी कोवळी पाने, शेंडा, फुलाचा भाग यावर उपजिवीका करतात आणि हळूहळू इतर पानाकडे वळून सर्व पाने खातात़ यानंतर अळी पिकाच्या कणीस, बोंड, फुले, फळे यांच्यावर हल्ला करते़ हा भाग खाताना अळी शरीराचा अर्धा भाग आत आणि अर्धा बाहेर ठेवते़ ही अळी खादाड असल्याने नुकसान होते. शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे़ (शहर प्रतिनिधी)
गळीत, तृण, कडधान्य पिकांवर रोगांचे आक्रमण
By admin | Updated: August 9, 2014 23:53 IST